

विटा : बीएसएफ, आसाम रायफल्स, आयटीबीपीमध्ये नोकरी लावतो, असे आमिष दाखवून तीन तरुणांची 3 लाख 78 हजार 200 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अमितकुमार संजय कुंभार (रा. नेर्ले, ता. वाळवा) याच्याविरुद्ध विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दीपक सखाराम शिंदे (रा. कुर्ली, ता. खानापूर), मेधाराणी संजय महाडिक (रा. आंबेगाव, ता. कडेगाव) व सतीश राजाराम गुजले (रा. लेंगरे, ता. खानापूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणांचा संशयित अमितकुमार कुंभार याच्याशी संपर्क आला होता. त्याने आपण सैन्यात अधिकारी असल्याचे भासवले, तसेच सैन्य भरतीचा विशेष कोटा आपल्याकडे असून त्यातील सर्व आर्थिक व्यवहार आपणच पाहतो, असे सांगून या तिघांचा विश्वास संपादन केला.
संशयिताने या तिघांना मुंबई गार्ड बोर्ड, आसाम रायफल, टी.ए., आय.टी.बी.पी. आणि बी.एस.एफ. अशा निमलष्करी दलांमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी त्याने बँक खात्याद्वारे 1 लाख 28 हजार 200 रुपये आणि रोख स्वरूपात 2 लाख 50 हजार रुपये, असे एकूण 3 लाख 78 हजार 200 रुपये उकळले. मात्र, दीर्घकाळ उलटूनही नोकरी न लागल्याने आणि अमितकुमारने पैशांची टाळाटाळ सुरू केल्याने आपली फसवणूक झाल्याचे तरुणांच्या लक्षात आले. फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तरुणांनी विटा पोलिस ठाण्यात धाव घेतली. संशयित अमितकुमार कुंभार याच्याविरुद्ध नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे.