Sangli Crime : इराणी टोळीतील सराईत गुन्हेगार गजाआड

सांगली एलसीबीची कारवाई; 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त
Sangli Crime News
इराणी टोळीतील सराईत गुन्हेगार गजाआड
Published on
Updated on

सांगली : आंतरराज्य इराणी टोळीतील एका सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. संशयिताकडून 3 लाख 20 हजार 300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्याने तीन महिन्यांपूर्वी ईश्वरपूर येथे एका ज्येष्ठ नागरिकाला लुटल्याची कबुली दिली आहे. इक्बाल हिम्मतलाल बेग (वय 59, रा. कुडची, ता. रायबाग, जि. बेळगाव, कर्नाटक) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

23 फेब्रुवारी रोजी दुपारी ईश्वरपूर येथील शिवाजी चौकात चावडीसमोरील प्रेरणा किराणा स्टोअर्सबाहेर दुकान मालक आनंदा महादेव वडगावकर (वय 78) हे उभे होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या 35 ते 40 वयोगटातील दोन अनोळखी व्यक्तींनी वडगावकर यांच्याजवळ येऊन ‌‘तंबाखू-गुटखा आहे का?‌’ अशी विचारणा केली. वडगावकर यांचे वय जास्त असल्याने आणि त्यांना कमी ऐकू येत असल्याचा गैरफायदा घेऊन, आरोपींनी अत्यंत शिताफीने त्यांच्या गळ्यातील 1 तोळा सोन्याची चेन आणि अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी नजर चुकवून काढून घेतली आणि दुचाकीवरून पळ काढला होता. याप्रकरणी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव यांचे पथक करत होते. दरम्यान, सांगलवाडी ते बायपास रोड परिसरात दुचाकीवरून एक सराईत गुन्हेगार फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने बेग याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता, त्याने तीन महिन्यांपूर्वी साथीदार हैदर नजरू इराणी याच्यासह दुचाकीवरून येत गुन्हा केल्याची कबुली दिली. बेग हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही मालमत्तेचे विविध गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून पोलिसांनी 3 लाख 20 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news