

मिरज : म्हैसाळ-विजयनगर (ता. मिरज) येथील राही पॅलेस डान्सबारची पाळेमुळे खोलवर पोहोचली आहेत. डान्सबारच्या मालकावरही आता गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी हलचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, डान्सबार सुरू करण्यास कोणी परवानगी दिली, याचीही चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.
राही पॅलेस बारमध्ये डान्सबार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर मिरजेचे पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्या विशेष पथकाने छापा टाकून कारवाई केली होती. यावेळी कोल्हापूरमधील हायप्रोफाईल बारबालांसह पाच ग्राहकांना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली. या डान्सबारमध्ये प्रत्येक सोमवारी बारबाला बोलावल्या जात असल्याची चर्चा आहे. हा प्रकार कधी पासून सुरू होता? याचीही चौकशी सुरू आहे. सुरुवातीला हॉटेलच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आता मालकावरही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या डान्सबारची पाळेमुळे खोलवर असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात डान्सबारला बंदी असताना येथे परवानगी दिली कोणी? राही पॅलेस बारचा व्यवस्थापक आणि मालक खात्यातील कोणा-कोणाच्या संपर्कात होते, याचीही चौकशी सुरू आहे. बारबालांच्या एजंटांचे लागेबांधे कुठेपर्यंत आहेत, याचीही माहिती घेतली जात आहे. त्यामुळे या डान्सबारची पाळेमुळे आणखी खोलवर असल्याचे समोर येत आहे.
डान्सबार चालकांचे धाबे दणाणले
कोल्हापूरमधील बारबाला मागणीनुसार पश्चिम महाराष्ट्रात छुप्या पद्धतीने सुरू असणाऱ्या डान्सबारमध्ये पुरविल्या जात असल्याची माहिती समोर येत आहे. एरव्ही मॅनेज होणारे प्रकरण यावेळी मात्र कारवाईमुळे ताणले गेल्याने पश्चिम महाराष्ट्रातील डान्सबार चालकांचे धाबे दणाणले आहे.