Hutatma Sugar Factory‌ : ‘हुतात्मा‌’चे अध्यक्ष वैभव नायकवडी यांचा राजीनामा

संचालकांकडून अविश्वास प्रस्ताव ः ठरावापूर्वी पद सोडले
वैभव नायकवडी
वैभव नायकवडी
Published on
Updated on

वाळवा ः पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी अखेर सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या 42 दिवसांपासून कारखान्यावर सभासद व शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन सुरू होते. अखेर सोमवारी झालेल्या घडामोडींनंतर नायकवडी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

वैभव नायकवडी म्हणतात

राजीनाम्यानंतर पत्रकारांशी बोलताना वैभव नायकवडी म्हणाले, हुतात्मा संकुलातील सर्व संस्था चांगल्या चालाव्यात, हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे. आज राज्यभर सहकार क्षेत्रात हुतात्माचा एक वेगळा आदर्श आहे आणि त्याला कसलेही गालबोट लागू नये, यासाठीच मी कारखान्याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे.

माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि सांगली जिल्हा बँकेचे संचालक सी. बी. पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झालेल्या बैठकीत सोमवारी राजीनामा देण्याचे ठरले होते. त्यानुसार आज कारखान्याच्या कार्यकारी संचालकांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. यापुढेही संकुलाच्या प्रगतीसाठी कार्यरत राहणार असून, सर्व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस नोंदी करून हुतात्माला सहकार्य करावे.

वैभव नायकवडी यांनी दिलेला राजीनामा सी. बी. पाटील यांनी आंदोलनस्थळी आंदोलकांसमोर वाचून दाखवला. यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनीही भूमिका स्पष्ट केली. यावर उपस्थित आंदोलकांनी आपले प्रश्न मांडले.

दुसरीकडे, अध्यक्ष वैभव नायकवडी यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला होता. त्यानुसार कारखान्याच्या 16 संचालकांनी रविवारीच आष्टा येथे अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांच्यासमोर उपस्थित राहून या अविश्वास ठरावावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. अध्यक्ष नायकवडी यांनी कारखान्यावरील कर्ज फेडूनच राजीनामा द्यावा, या मागणीसाठी किरण नायकवडी, गौरव नायकवडी व केदार नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू होते. सोमवारच्या निर्णयावेळी 15 गावांतील सभासद व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news