Sangli Rain Update : हिप्परगी बॅरेजचे २१ दरवाजे उघडले; पूरधोका कमी होण्यास मदत

आंदोलन अंकुश संघटनेच्या मागणीनंतर पाटबंधारे विभागाची कार्यवाही; नदीकाठच्या गावांना दिलासा
Sangli Rain Update
हिप्परगी बॅरेजचे २१ दरवाजे उघडले
Published on
Updated on

शिरढोण : हिप्परगी बॅरेजचे सर्व २१ दरवाजे बुधवारी (दि.८) सायंकाळी साडेपाच वाजता पूर्णपणे उघडण्यात आल्याने कृष्णा व पंचगंगा नदीतील पाण्याचा फुग कमी होण्यास मदत होणार आहे व संभाव्य पूरस्थितीवर नियंत्रण मिळविण्यास हातभार लागणार आहे.

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीपात्रातील पाण्याची आवक झपाट्याने वाढत होती. त्यामुळे पंचगंगा नदीची पातळी इशारा पातळीकडे सरकत असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर आंदोलन अंकुश संघटनेने सांगली येथील कृष्णा पाटबंधारे विभागाकडे तातडीचे निवेदन देत कर्नाटक सरकारशी त्वरित संपर्क साधून हिप्परगी बॅरेजचे सर्व दरवाजे उघडण्याची मागणी केली होती. दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा १ जूनपूर्वी दरवाजे उघडण्याची नियमित प्रक्रिया झालेली नव्हती. मात्र, सध्याच्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने निर्णय घेण्याची मागणी संघटनेने केली होती.

निवेदनाची दखल घेत कृष्णा पाटबंधारे विभागाने कर्नाटक पाटबंधारे खात्याशी संपर्क साधून आवश्यक पत्रव्यवहार केला. त्यानंतर बुधवारी सायंकाळी हिप्परगी बॅरेजचे सर्व २१ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले. त्यामुळे नदीतील पाण्याचा फुग कमी होण्यास सुरुवात झाली असून पूराचा संभाव्य धोका कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सतत सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या गावांवर लक्ष ठेवले असून परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे. नागरिकांनीही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नदीकाठच्या गावांना दिलासा..

हिप्परगी बॅरेजचे सर्व २१ दरवाजे उघडल्याने कृष्णा व पंचगंगा नदीतील पाण्याचा फुग कमी होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये निर्माण झालेली भीती काही प्रमाणात दूर झाली असून शेतकरी व नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. पावसाचा जोर कायम असला तरी पाण्याचा निचरा वेगाने होण्यास मदत मिळणार असल्याने पूरधोकाही आटोक्यात राहील. दरम्यान पावसाळा संपेपर्यंत यामध्ये सातत्य गरजेचे आहे, असे आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news