Sangli Rain update : सांगलीसह जिल्ह्यात दम’धार’

पावसाचा जोर वाढला : आयर्विन पुलाजवळ पातळी २४ फुटांपर्यंत
Sangli Rain update
औदुंबर - पाऊस मुसळधार कोसळत आहे, त्यामुळे येथील प्रसिद्ध दत्त मंदिर परिसरात कृष्णेला आलेला पूर.
Published on
Updated on

​सांगली : शहर आणि जिल्ह्यामध्ये बुधवारीही पावसाचा जोर कायम राहिला. सकाळच्या सत्रात पावसाने काही काळ उघडीप दिली. सूर्यदर्शनही झाले होते. दुपारी तीननंतर मात्र जोरदार पाऊस सुरू झाला. सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असलेल्या या दमदार पावसामुळे कृष्णा नदीच्या पातळीत वाढ झाली. आयर्विन पुलाजवळ पाणी २४ फुटांवर पोहोचले.

शिराळा तालुक्यात सर्वाधिक २९.८ मि.मी. पावसाची नोंद झाली असून धरणांमधील पाणीसाठ्यातही मोठी वाढ होत आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ३४.४० टी.एम.सी. साठवण क्षमता असलेल्या वारणा धरणात सकाळी ८ वाजेपर्यंत १७.८८ टी.एम.सी. पाणीसाठा झाला. जिल्ह्यातील व शेजारील प्रमुख धरणांचा विचार केला असता कोयना धरणात ४२.०२, धोम धरणात ७.४५, राधानगरीत ४.६०, दूधगंगा धरणात ६.२८ आणि कर्नाटकातील अलमट्टी धरणात ३३.३४ टी.एम.सी. साठा झाला आहे.

सध्या कण्हेर धरणातून ४०, उरमोडीतून १०, तारळीतून ९७, दूधगंगा धरणातून १०० आणि अलमट्टी धरणातून ४८३ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. हरिपूर येथील अंकली पुलाजवळ २७.८ फूट पातळीची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ७.३ मि.मी. पावसाची नोंद झाली. यामध्ये शिराळा तालुक्यात सर्वाधिक २९.८ मि.मी. पाऊस पडला असून, १ जूनपासून येथील एकूण पाऊस ४४१.९ मि.मी.वर पोहोचला. याशिवाय कडेगाव तालुक्यात ११, कवठेमहांकाळ येथे ७.२, पलूसमध्ये ७ , वाळवा तालुक्यात ६ , खानापूर येथे ५.३, मिरजमध्ये ५.२, तासगावमध्ये ३.८, आटपाडीत १.२, तर जत तालुक्यात १ मि.मी. पाऊस झाला.

महत्त्वाचे रस्ते बंद

मुसळधार पाऊस आणि पुराच्या पाण्यामुळे मिरज तालुक्यातील सावळवाडी-शेरे कवठे-समडोळी-सांगलीवाडी या रस्त्यावरील पुलावर आणि जोडरस्त्यावर पाणी आले आहे. पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने मध्यरात्रीपासून हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण बंद केला आहे. प्रशासनाने या मार्गावरील प्रवाशांसाठी 'कवठेपिरान-समडोळी-सांगलीवाडी' हा पर्यायी मार्ग निश्चित केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news