Sangli Crime : गोटखिंडीत चार बंद घरे फोडली

१६ तोळे सोन्यासह रोकड लंपास
House Theft
चोरट्यांनी फोडलेली तिजोरी.
Published on
Updated on

​आष्टा : गोटखिंडी (ता. वाळवा) येथे शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच गल्लीतील चार बंद घरे फोडली. या घरफोडीत चोरट्यांनी कपाटे आणि तिजोऱ्यांचे लॉक तोडून एकूण १६ तोळे सोने आणि हजारो रुपयांची रोकड लंपास केली. एकाच रात्री झालेल्या या मोठ्या चोऱ्यांमुळे परिसरात खळबळ उडाली. शनिवारी रात्री उशिरापर्यंत आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बाबुराव रामचंद्र गावडे पती-पत्नी आषाढी वारीसाठी पंढरपूरला गेल्याने त्यांचे घर बंद होते. चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून कपाटातील सुमारे आठ तोळे सोन्याचे दागिने लांबवले. गावडे यांच्या शेजारी राहणारे नितीन तानाजी मोरे रात्री कोल्हापूर येथे रात्रपाळीच्या कामावर गेले होते. चोरट्यांनी त्यांच्याही बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील आठ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले.

याच गल्लीतील अवधूत शिंगटे सध्या मळ्यात राहत असल्याने त्यांचे गावातील घर बंद होते. चोरट्यांनी हे तिसरे घरही फोडले, मात्र तेथे मौल्यवान वस्तू त्यांच्या हाती लागल्या नाहीत. त्यानंतर चोरट्यांनी शेजारीच राहणाऱ्या प्रशांत शिंगटे यांच्या बंद घरात प्रवेश करून कपाटातील ४ हजार रुपयांची रोकड लंपास केली. चोरट्यांनी कपाटातील कपडे आणि महत्त्वाची कागदपत्रे जमिनीवर अस्ताव्यस्त फेकून दिली होती.

चोरी करताना शेजाऱ्यांना जाग आली तरी त्यांनी बाहेर येऊ नये म्हणून चोरट्यांनी गल्लीतील इतर घरांच्या दरवाजांना बाहेरून कड्या लावल्या होत्या. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याबाबत गावडे व मोरे यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आष्टा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून तपासासाठी सांगलीहून श्वानपथक मागवण्यात आले होते.

गोटखिंडी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून शेतशिवारातही चोऱ्यांचे सत्र सुरू आहे. विहिरी व बोअरवेलमधील महागड्या वीज केबल चोरीला जात असल्याने शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांच्या नेतृत्वाखाली काही दिवसांपूर्वी आष्टा पोलिस ठाण्यात निवेदन देऊन गस्त वाढवण्याची मागणी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news