

कासेगाव : भैरेवाडी (ता. शिराळा) येथील बाजीराव रामचंद्र सूर्यवंशी (वय ५२) यांचा जनावरांच्या गोठ्यातील तारेच्या जाळीत विद्युत प्रवाह उतरल्याने, विजेचा तीव्र धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. गोठ्यातील शेळ्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतलेल्या बाजीराव यांना स्वतःचा जीव गमवावा लागल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना बुधवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली.
बाजीराव सूर्यवंशी हे मुंबई येथे भाजीपाला व्यवसाय करत होते. आपल्या शेतातील ऊस लागणीच्या कामासाठी ते तीन दिवसांपूर्वीच आपल्या मूळ गावी भैरेवाडी येथे आले होते. बुधवारी सकाळी त्यांनी शेतात ऊस लागणीचे काम केले आणि दुपारी ते घरी परतले होते.
दरम्यान, त्यांच्या पत्नी शोभाताई यांना गोठ्यातील शेळ्या मोठ्याने ओरडत असल्याचा आवाज आला. परिसरात बिबट्याचा वावर असल्याने काही अनुचित प्रकार घडला असावा, या भीतीने त्यांनी पती बाजीराव यांना गोठ्याकडे पाहण्यासाठी पाठवले. बाजीराव तात्काळ गोठ्याकडे धावले, मात्र तेथील लोखंडी तारेच्या जाळीत विद्युत प्रवाह सुरू असल्याची त्यांना कल्पना नव्हती. त्यांनी जाळीला हात लावताच त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि ते जागीच कोसळले.
या घटनेनंतर उपसरपंच सत्यविजय भोसले व ग्रामस्थांनी त्यांना तातडीने ईश्वरपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. बाजीराव सूर्यवंशी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. या घटनेची नोंद शिराळा पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.