Sangli News : नगरसेवक सुनील मलगुंडेही अपात्र

नगराध्यक्षांचे बंधू, ईश्वरपुरात राष्ट्रवादीला दुसरा धक्का : अतिक्रमणप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल
Sangli News
नगरसेवक सुनील मलगुंडेही अपात्र
Published on
Updated on

ईश्वरपूर : अतिक्रमण व अनधिकृत बांधकामप्रकरणी उरूण-ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना अपात्र ठरवल्यानंतर आता त्यांचे बंधू नगरसेवक सुनील मलगुंडे यांनाही जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले आहे. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ४४(१)(ई) अंतर्गत सोमवारी हा आदेश दिला. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) गटासह नेते जयंत पाटील यांना सलग दुसरा मोठा धक्का बसला असून ईश्वरपूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शिवसेनेचे जयकर जाधव यांनी दाखल केलेल्या अर्जावर जिल्हाधिकाऱ्यांनी हा निकाल दिला आहे. मलगुंडे यांना या आदेशाविरोधात अपील करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. यापूर्वी शुक्रवारीच जिल्हाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनाही याच प्रकरणात अपात्र ठरवले होते. आता हे प्रकरण न्यायालयात जाणार असून न्यायालय काय निकाल देते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

तक्रारदार जाधव यांनी, नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे व त्यांचे बंधू सुनील मलगुंडे यांनी अतिक्रमण करून अवैध बांधकाम केल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केली होती. याप्रकरणी जाधव यांनी सादर केलेली संबंधित कागदपत्रे, सात-बारा उतारे, फेरफार नोंदी, नकाशे, भूअभिलेख विभागाचा अभिप्राय तसेच इतर पुराव्यांचे परीक्षण करून जिल्हाधिकाऱ्यांनी हा निकाल दिला. भूमापन क्रमांक ८/१अ, ८/१अ/१२, ८/१अ/१३, ८/१ब, ८/२ व ११ या मिळकतींमध्ये पेठ-सांगली राज्य महामार्गालगत अतिक्रमण करून बेकायदेशीर व अनधिकृत लॉजिंग आणि शॉपिंग सेंटरचे बांधकाम करण्यात आल्याचा निष्कर्ष आदेशात नोंदविण्यात आला आहे. यापूर्वी अशा प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निकालाचा दाखला देत जिल्हाधिकाऱ्यांनी नगरसेवक सुनील मलगुंडे यांना अपात्र ठरविले. हा आदेश मान्य नसल्यास आदेश प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांच्या आत राज्य शासनाकडे अपील दाखल करण्याची मुभा देण्यात आली आहे.

डिसेंबर महिन्यात झालेल्या पालिका निवडणुकीत सुनील मलगुंडे हे प्रभाग १३ मधून निवडून आले होते. त्यांचे थोरले बंधू आनंदराव मलगुंडे नगराध्यक्ष, तर सुनील मलगुंडे नगरसेवक झाले होते. मात्र, दोन्ही लोकप्रतिनिधींवर लागोपाठ अपात्रतेची कारवाई झाल्याने मलगुंडे गटाला मोठा धक्का बसला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news