

मिरज : सांगली व सोलापूर जिल्ह्यांत निर्माण झालेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या कालव्याद्वारे पुढील दोन दिवसांत तातडीने पाणी सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कार्यकारी संचालक धुमाळ यांना दिले आहेत. मिरजेचे आमदार डॉ. सुरेश खाडे व जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या आग्रही मागणीला यामुळे यश आले आहे.
सांगली जिल्ह्यातील मिरज पूर्व भाग, कवठेमहांकाळ, जत तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व मंगळवेढा तालुक्यात यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाला आहे. यामुळे शेती, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. येथील शेतकरी व नागरिक मोठ्या संकटात सापडले असल्याने या दुष्काळी भागाला तातडीने पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार डॉ. खाडे आणि आमदार पडळकर यांनी मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांची भेट घेऊन केली होती.
आमदारांच्या मागणीची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस व जलसंपदामंत्री विखे-पाटील यांनी प्रशासनाला दोन दिवसांत पाणी सुरू करण्याचे निर्देश दिले. यासोबतच, पाणी सोडण्यासाठी तांत्रिक अडथळा ठरत असलेली सुमारे १० कोटी रुपयांची थकीत वीज बिल किंवा पाणीपट्टीची रक्कम जलसंपदा मंत्र्यांच्या स्वनिधीतून अदा करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण माहितीही या वेळी देण्यात आली.
या निर्णयामुळे कालव्याद्वारे पाणीपुरवठा सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला असून दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या पाणी आवर्तनामुळे सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील बाधित तालुक्यांमधील हजारो हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल, तसेच पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्याही मोठ्या प्रमाणात दूर होण्यास मदत होणार आहे.