Sangli News : 15 लाखांचा सुरक्षा खर्च, तरी वाहनांची चोरी

गार्ड गायब; वॉचमन टॉवरचा उपयोग काय? : वाहनांचे सुटे भागही चोरतात
Sangli Civil Hospital
सांगली : सिव्हिलमधील वॉचमन टॉवर.
Published on
Updated on

सांगली : महाराष्ट्रासह कर्नाटकातूनही हजारो रुग्ण रोज उपचारासाठी येणारे सांगली सिव्हिल हॉस्पिटल तरी सुरक्षित आहे का? या रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह आहे. रुग्णालय प्रशासनाकडून दरमहा जवळपास 15 लाख रुपये सुरक्षा व्यवस्थेवर खर्च होत असतानाही, रुग्णालय परिसरातून वाहनचोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे, सुरक्षेसाठी नियुक्त केलेले गार्ड प्रत्यक्षात परिसरात फारसे दिसत नसल्याची तक्रार रुग्ण, नातेवाईक आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

सिव्हिल हॉस्पिटल परिसर म्हणजे दिवस-रात्र प्रचंड वर्दळ, प्रचंड घाई, सारा ताण-तणाव. आपत्कालीन विभागासमोर सतत धावणाऱ्या ॲम्ब्युलन्स, पार्किंगमध्ये उभ्या असंख्य दुचाकी-चारचाकी, रुग्णांच्या नातेवाईकांची लगबग आणि उपचारासाठी आलेल्या लोकांची गर्दी... यामुळं परिसर बारोमास आणि चोवीस तास कायम गजबजलेला. पण या इतक्या गर्दीच्या आणि घाईच्या सिव्हिल हॉस्पिटलची सुरक्षा मात्र रामभरोसे आहे.

गेल्या अनेक महिन्यांत सिव्हिल परिसरातून दुचाकी चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही वाहनांचे सुटे भागही लंपास झाल्याच्या तक्रारी आहेत. मात्र या घटनांमधील एकाही चोरट्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. सुरक्षा कर्मचारी दिसत नाहीत, त्यामुळं चोरही कुठं सापडत नाहीत. मग सुरक्षेसाठी खर्च होणारा लाखो रुपयांचा निधी नेमका कुणासाठी आणि कशासाठी खर्च होतो?, असा संतप्त सवाल जागरुक नागरिक विचारत आहेत.

अगोदरच सिव्हिल हॉस्पिटल म्हटलं की सामान्य माणूस बिचकतो, घाबरतो. या असुरक्षेमुळं रुग्णांच्या नातेवाईकांची भीती आणखी वाढते. उपचारासाठी आलेल्या व्यक्तींना वाहनांचीही काळजी वाटत राहते. एक पाय रुग्णालयात तर दुसरा पाय पार्किंगमध्ये, अशी अवस्था. अनेक नातेवाईक तर रात्री वाहनाजवळच बस्तान बसवतात. पार्किंग परिसरात सीसीटीव्ही देखरेख वाढविण्याची आणि सुरक्षा गार्ड तैनात करण्याची मागणी अनेक दिवसांपासून आहे. सिव्हिलसारख्या संवेदनशील ठिकाणी अशी ढिसाळ सुरक्षा व्यवस्था धोकादायक आहे. प्रशासनानं तातडीनं सुरक्षा यंत्रणेचं ऑडिट करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

रुग्णालय प्रशासनानं खासगी सुरक्षा ठेवण्यासाठी सुरक्षा एजन्सी नेमली असून, या एजन्सीमध्ये चार सुपरवायझर, 15 सुरक्षा रक्षक, 30 सशस्त्र गार्ड आणि सहा महिला गार्ड अशा एकूण 56 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचं सांगितलं जातं, पण एवढी मोठी फौज नेमकी कुठं कार्यरत असते? परिसरात कुठंही, अगदी महत्त्वाच्या ठिकाणीही कधीच गार्ड दिसत नाही. हे दुर्दैव आहे.
रवींद्र वळवडे, सामाजिक कार्यकर्ते, सांगली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news