

सांगली : वाढीव घरपट्टीविरोधात तीव्र लढा उभारण्याचा निर्धार वाढीव घरपट्टीविरोधी कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला. दि. २० जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता महापालिकेसमोर बोंबाबोंब आंदोलन, तर दि. ४ ऑगस्ट रोजी सांगली, मिरज व कुपवाड बंद तसेच भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
'कष्टकऱ्यांची दौलत' येथे झालेल्या बैठकीला नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर, माजी सभापती हणमंत पवार, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा, हमाल पंचायतचे नेते विकास मगदूम, मराठा क्रांती मोर्चाचे डॉ. संजय पाटील, नितीन चव्हाण, मनसेचे तानाजी सावंत, नागरिक संघटनेचे कार्यवाह वि. द. बर्वे, माजी नगरसेवक मुन्ना कुरणे, सृष्टी संवर्धन फाऊंडेशनचे अध्यक्ष रवींद्र वळवडे, शेकापचे ॲड. अजित सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब मासुले, नागरिक हक्क संरक्षण समितीचे विनायक सिंहासने, गजानन मिरजे, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष नितीन मिरजकर, ग्राहक पंचायतचे डॉ. ज्ञानचंद्र पाटील उपस्थित होते.
नागरिकांच्या तक्रारींसाठी फॉर्म
महापालिकेच्या वाढीव घरपट्टीसह पाणीपट्टी, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, रस्ते, अतिक्रमण, बांधकाम परवानगी आणि इतर नागरी समस्यांबाबत नागरिकांच्या हरकती व तक्रारी एकत्रित करण्यासाठी स्वतंत्र गुगल फॉर्म तयार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या माध्यमातून नागरिकांच्या समस्या लेखी स्वरूपात संकलित करून त्या महापालिका प्रशासनासमोर पुराव्यानिशी मांडण्यात येणार आहेत.