

वळसंग : संख (ता. जत) येथील रामू विठ्ठल गायकवाड (वय 30) या तरुणाचा मृतदेह सोमवारी सकाळी खंडनाळ रस्त्याजवळ संशयास्पद स्थितीत आढळून आला. मृत्यूचे नेमके कारण उत्तरीय तपासणीच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे उमदी पोलिसांकडून सांगण्यात आले.
रामू गायकवाड हे बुधवारी रात्री सुमारे 9 वाजता ‘खंडनाळला जाऊन येतो’ असे सांगून घरातून बाहेर पडले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. गुरुवारी सकाळी खंडनाळ रस्त्याच्या कडेला त्यांचा मृतदेह मिळून आला. घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिस ठाण्याचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. रामू गायकवाड हे वडील व भावासह एकत्र कुटुंबात राहत होते. त्यांचा सहा ते सात वर्षांपूर्वी विवाह झाला असून त्यांना एक मुलगा व एक मुलगी, अशी अपत्ये आहेत.
रामू यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र ग्रामस्थांमधून तर्कवितर्क सुरू आहेत. या संशयास्पद मृत्यूमुळे संख व परिसरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास उमदी पोलिस करत आहेत.