

सांगली : महापालिका निवडणुकीसाठी भाजप इच्छुकांच्या मुलाखती काल, रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पूर्ण झाल्या. रविवारी 46 जागांसाठी 303 इच्छुकांनी मुलाखत दिली. एकूण 78 जागांसाठी शनिवार व रविवारी 529 इच्छुकांनी मुलाखत दिली. दरम्यान, कोणत्या इच्छुकांना उमेदवारी मिळणार, हे मुलाखत अभिप्राय आणि प्रभागातील सर्वेक्षण यावर ठरणार आहे. उमेदवारांची यादी प्रदेश भाजप स्तरावर घोषित होणार आहे.
येथील सर्किट हाऊसशेजारी पाटीदार भवन येथे या मुलाखती झाल्या. आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, पश्चिम महाराष्ट्र संघटक मकरंद देशपांडे व शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी मुलाखती घेतल्या. शनिवारी प्रभाग क्रमांक 1 ते 8 मधून 226 इच्छुकांनी मुलाखत दिली. रविवारी प्रभाग क्रमांक 9 ते 20 मधून 303 इच्छुकांनी मुलाखत दिली. प्रभाग क्रमांक 9 मधून 20 इच्छुकांची मुलाखत झाली. प्रभाग क्रमांक 10 मधून 26, प्रभाग क्रमांक 11 मधून 17, प्रभाग क्रमांक 12 मधून 33, प्रभाग क्रमांक 13 मधून 6, प्रभाग क्रमांक 14 मधून 64, प्रभाग क्रमांक 15 मधून 22, प्रभाग क्रमांक 16 मधून 17, प्रभाग क्रमांक 17 मधून 25, प्रभाग क्रमांक 18 मधून 18, प्रभाग क्रमांक 19 मधून 39, तर प्रभाग क्रमांक 20 मधून 16 इच्छुकांनी मुलाखत दिली.
भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली होती. इच्छुकांनी कोणतेही शक्तिप्रदर्शन केले नाही. भाजपमध्ये किती वर्षे काम करता, सक्रिय सदस्य आहात का, प्रभागातील राजकीय, सामाजिक स्थिती काय आहे, पक्षाची भूमिका, ध्येय-धोरणे आदीविषयी इच्छुकांना प्रश्न विचारले जात होते.
पूर्वी उमेदवार शोधावे लागायचे..!
आमदार सुरेश खाडे म्हणाले, पूर्वी भाजपला उमेदवार शोधावे लागत होते, पण आता महापालिकेच्या 78 जागांसाठी भाजपकडे तब्बल 529 इच्छुकांनी मुलाखत दिली आहे. पक्षाचा मोठा विस्तार झाल्याचे तसेच जनतेचाही भाजपवर विश्वास वाढल्याचे हे द्योतक आहे.
95 टक्के महिला उच्चशिक्षित
भाजपकडे इच्छुक महिलांची संख्या मोठी आहे. यातील 95 टक्के महिला उच्चशिक्षित आहेत. इच्छुक महिलांना भाजपच्या ध्येय-धोरणांविषयीही चांगली जाण असल्याचे दिसून आले, असे आमदार खाडे यांनी सांगितले.
मुस्लिमही इच्छुक : गाडगीळ
आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, महापालिका निवडणुकीत विकास हाच मुद्दा राहणार आहे. भाजपकडे मुलाखत दिलेल्यांमध्ये सर्व जाती, धर्माचे इच्छुक आहेत. मुस्लिम समाजातील काही इच्छुकांनीही भाजपकडे उमेदवारी मागितली आहे.
शेखर इनामदार म्हणाले, भाजपची कार्यपद्धती, केंद्र व राज्यातील सत्तेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती इच्छुक उमेदवारांना आहे. मुलाखतींचा अभिप्राय प्रदेश भाजपला पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर प्रदेशस्तरावरून उमेदवारांच्या नावांची घोषणा होईल, अशी माहिती माजी आमदार दिनकर पाटील, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी दिली.