सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपची प्रचार यंत्रणा आता सज्ज झाली आहे. काही प्रभागात प्रचारफेऱ्या, पदयात्रा सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज-शनिवारी दुपारी सांगलीत पक्षाच्या प्रचाराचा नारळ फोडून रीतसर प्रारंभ करतील आणि त्यानंतर प्रचाराचा खरा धडाका सुरू होईल. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस महापालिकेच्या विकासाचे व्हिजन मांडतील.
चंद्रकांत पाटील यांनीही महापालिका क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने आराखडा तयार केला आहे. त्या संदर्भातही ते या सभेत नागरिकांना माहिती देतील. मुख्यमंत्री फडणवीस भाजपच्या प्रचार प्रारंभीच सांगलीत सभा घेत आहेत. त्यामुळे पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते अत्यंत उत्साहात आहेत. निवडणूक प्रचाराची सुरुवातच धडाकेबाज होणार आहे, असा विश्वास ते व्यक्त करीत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर खऱ्या अर्थाने प्रचार गती घेईल, असे पक्षाच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख केदार खाडिलकर यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाच्या सांगली, मिरज आणि कुपवाडमधील सर्व उमेदवार, नेते आणि कार्यकर्त्यांच्या एकत्रित बैठका सांगली, मिरजेत पार पडल्या आहेत. त्यामध्ये निवडणूक प्रचाराचे पद्धतशीर नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार त्या-त्या प्रभागात उमेदवारांनी मतदारांच्या भेटी घ्यायला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या शनिवारच्या सभेनंतर प्रचाराची खरी सुरुवात होणार आहे.
पक्षाच्या प्रसिद्धी यंत्रणेतर्फे माहिती देण्यात आली की, मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेच्या तयारीसाठी बैठका घेण्यात आल्या आहेत. सांगलीतील स्टेशन चौकात दुपारी एक वाजता सभेला प्रारंभ होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि अन्य नेत्यांची भाषणे होतील. या सभेसाठी प्रत्येक प्रभागातून किमान एक हजार लोक उपस्थित राहावेत, असे आवाहन आमदार सुधीर गाडगीळ यांनी नियोजनाच्या बैठकीत केले होते. त्यानुसार प्रत्येक प्रभागात सभेच्या दृष्टीने तयारी सुरू आहे.
स्टेशन चौकात कलम 34 लागू
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्टेशन चौकात सभा होणार आहे. त्यामुळे स्टेशन चौकात महाराष्ट्र पोलिस अधीनियम 1951 चे कलम 34 लागू करण्यात आले आहे. राजवाडा चौक, आझाद चौक, बदाम चौक, सिद्धनाथ ट्रान्सपोर्टकडून स्टेशन चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर इतर वाहनांना बंदी केली आहे. या मार्गावर केवळ पोलिस, रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या वाहनांनाच परवानगी आहे. स्टेशन चौकातून जाणाऱ्या इतर वाहनांसाठी राजवाडा चौक-पटेल चौकमार्गे आमराई, आझाद चौक-आमराई कॉर्नरमार्गे पटेल चौक, बदाम चौक-पटवर्धन हायस्कूलमार्गे रिसाला रस्ता, सिद्धनाथ ट्रान्स्पोर्ट-पटेल चौकमार्गे राजवाडा चौक, असा रस्ता खुला ठेवण्यात आला आहे.