

कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथे सालाबादप्रमाणे पारंपरिक भावकाईदेवी बारा बलुते जोगण्या उत्सव सोमवार, दि. १३ जुलै ते गुरुवार दि. १६ जुलै या कालावधीत विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. या यात्रा उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती भावकाईदेवी यात्रा कमिटीच्यावतीने देण्यात आली.
उत्सवाच्या नियोजनानुसार, सोमवार, दि. १३ रोजी भावकाई देवीचे पूजन, दिवा काढणे आणि कासेगाव येथे पिसे व लावसट काढण्यात येईल. मंगळवार, दि. १४ रोजी शेणे येथे दिवा काढणे व पिसे काढली जातील. बुधवार, दि. १५ रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून, दुपारी ४ वाजता सवाद्य जोगण्या उत्सव भव्य मिरवणूक निघणार आहे. गुरुवार, दि. १६ रोजी सकाळी १० वाजता लोकनाट्य तमाशा आणि दुपारी ४ वाजता कुस्त्यांचे जंगी मैदान होणार आहे.
सामाजिक एकात्मतेचे प्रतीक असलेल्या व चार दिवस चालणाऱ्या या वार्षिक पारंपरिक उत्सवाचे नियोजन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी ग्रामपंचायत, पोलिस स्टेशन आणि आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यात्रेचा मुख्य पाटलाचा मान पिढ्यान् पिढ्या चालत आलेला असून, त्याचे वारसदार म्हणून महाराष्ट्राचे माजी सचिव नानासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा कमिटीने या संपूर्ण उत्सवाचे नियोजन केले आहे.