

बेडग : बेडग (ता. मिरज) येथील पाणंद रस्त्यांच्या नोंदींवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने आयोजित केलेली विशेष ग्रामसभा रविवारी वादळी ठरली. अनेक शेतकऱ्यांनी पाणंद रस्त्यांच्या नोंदींबाबत तीव्र आक्षेप नोंदवत प्रशासनाकडे आपल्या तक्रारी मांडल्या.
यापूर्वी याच विषयावर ग्रामपंचायत सदस्य कैलास पाटील व जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते अमरसिंह पाटील यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते. या आंदोलनाची दखल घेऊनच महसूल प्रशासनाने ग्रामसभा घेण्याचा निर्णय घेतला होता. ग्रामसभेत शेतकऱ्यांनी विविध कायदेशीर व तांत्रिक प्रश्न उपस्थित करत संबंधित रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी केली. यावर चर्चा झाल्यानंतर वादात असलेल्या सर्व ठिकाणांची स्थळपाहणी करून पुढील निर्णय घेण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती सरपंच उमेश पाटील यांनी दिली.
मंडल अधिकारी महादेव वंजारी यांनी सांगितले की, तहसीलदारांच्या सूचनेनुसार ग्रामस्थांकडून प्राप्त होणाऱ्या सर्व अर्जांचा स्वीकार करण्यात येत आहे. प्रत्येक अर्जाची प्रत्यक्ष स्थळपाहणी करून वस्तुस्थितीची काटेकोर पडताळणी केली जाईल. शेतकऱ्यांना नको असलेल्या रस्त्यांबाबत, तसेच नकाशावरील व न्यायालयीन वादातील रस्त्यांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करूनच योग्य तो कायदेशीर निर्णय घेतला जाईल. दरम्यान, या प्रकरणाबाबत अजूनही कोणाची तक्रार अथवा आक्षेप असल्यास लेखी तक्रार अर्ज महसूल विभागाकडे दाखल करावेत, असे आवाहन करण्यात आले.