Sangli News : धार्मिक स्थळांची तीन बांधकामे जमीनदोस्त

मध्यरात्री कारवाई; कर्नाळ रोड, मंगलमूर्ती कॉलनीतील अनधिकृत बांधकाम पाडले
Sangli News
कुपवाड : मंगलमूर्ती कॉलनी येथील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. यावेळी उपस्थित महापालिकेचे अधिकारी व पोलिस अधिकारी.
Published on
Updated on

सांगली : येथील कर्नाळ रोडवरील साईनाथनगर व महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 8 मधील मंगलमूर्ती कॉलनी (कुपवाड) येथील दोन धार्मिक स्थळांची अनधिकृत बांधकामे महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने पाडली. या कारवाईवेळी सुमारे 150 हून पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. साईनाथनगरमधील कारवाई सोमवारी मध्यरात्री 2.15 वाजण्याच्या सुमारास, तर मंगलमूर्ती येथील कारवाई पहाटे 4.45 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

महापालिकेचे पथक सोमवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास कर्नाळ रोड साईनाथनगर येथील अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी पोहोचले. उपायुक्त स्मृती पाटील, अतिक्रमणविरोधी विभागाचे प्रमुख नागार्जुन मद्रासी, सहायक आयुक्त सचिन सागावकर, अग्निशमन दलाचे प्रमुख कासाप्पा माने तसेच अतिक्रमणविरोधी विभागाचे 14 कर्मचारी, तीन जेसीबी आणि सुमारे दीडशे पोलिस असा फौजफाटा होता.

महापालिकेचे पथक आल्याचे समजताच महापालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, मुस्लिम ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक फिरोज पठाण, वसिम शिकलगार तिथे पोहोचले. याठिकाणी सुमारे 400 नागरिकांचा जमाव होता. त्यांनी जमावाला शांत केले आणि मध्यरात्रीच्या कारवाईवरून नाराजी व्यक्त केली. बकरी ईद सण झाल्यानंतर हे बांधकाम संबंधित मालक स्वत: उतरून घेतील, तोपर्यंत कारवाई थांबवा, अशी विनंती केली. महापालिकेचे पदाधिकारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही फोनवरून संपर्क साधण्यात आला. मात्र जिल्हा प्रशासनाच्या सूचनेकडे बोट दाखवत महापालिकेच्या पथकाने कारवाई अटळ असल्याचे सांगितले. मध्यरात्री 2.15 वाजण्याच्या सुमारास कारवाईस सुरुवात करण्यात आली. अर्धवट बांधकामाचे खांब (पिलर) तोडण्यात आले.

यानंतर महापालिकेच्या पथकाने कुपवाडमधील मंगलमूर्ती कॉलनी येथील विनापरवाना बांधकामाकडे मोर्चा वळवला. विनापरवाना पत्र्याचे शेड तसेच कंपाऊंड तोडले. याठिकाणी मदरसा सुरू होता, असे समजते. परिसरातील विद्यार्थी उर्दू व अरबी शिक्षण घेण्यासाठी येत असत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news