

कुपवाड : बामणोली (ता. मिरज) येथील दत्तनगर भागातील एक बेकायदेशीर प्रार्थनास्थळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशाने आणि मोठ्या पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आले. सोमवारी सकाळी सहा वाजता सुरू झालेली ही कारवाई चार जेसीबी यंत्रांच्या साहाय्याने दुपारी साडेबारा वाजता पूर्ण करण्यात आली.
दत्तनगर भागातील भूमापन क्रमांक 15/4/8 मधील एका बेकायदेशीर बांधकामाबाबत नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यानुसार महसूल अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत हे बांधकाम बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले. या जागेवर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी 13 जून 1994 रोजी रहिवास कारणासाठी बिनशेती आदेश मंजूर केला होता. मात्र, सध्याच्या भूखंडधारकांनी सक्षम प्राधिकाऱ्याची कोणतीही परवानगी न घेता अटींचे उल्लंघन करून तिथे प्रार्थनास्थळ उभारल्याचे महसूल विभागाच्या निदर्शनास आले.
राज्य शासनाच्या गृह विभागाच्या नियमांनुसार, धार्मिक स्थळाच्या बांधकामापूर्वी गृह विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. मात्र, हजरत अबुबक्कर (रजी) जमियतखाना संस्थेने अशी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी कार्यालयाने 30 ऑगस्ट आणि 30 सप्टेंबर 2024 रोजी संबंधितांना नोटिसा बजावून हे विनापरवाना बांधकाम 30 दिवसांत स्वतःहून काढून घेण्याचे आदेश दिले होते. मुदतीत कारवाई न केल्यास बांधकाम पाडून त्याचा खर्च वसूल करण्याचा इशाराही देण्यात आला होता. पण नोटीस मिळूनही भूखंडधारकांनी बांधकाम न हटवता तिथे विनापरवाना धार्मिक वापर सुरूच ठेवला होता. अखेर जिल्हा प्रशासनाने सोमवार दि. 25 रोजी सकाळी सहा वाजल्यापासून धडक मोहीम राबवून हे अनधिकृत बांधकाम पूर्णपणे पाडले.
ही कारवाई जिल्हाधिकारी मैनाक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे, अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, मिरजेचे पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, नायब तहसीलदार मनोहर पाटील, सहायक पोलिस निरीक्षक आनंदराव घाडगे, मंडल अधिकारी भरत काळे, ग्राम महसूल अधिकारी प्रमोद कुंभार आणि ग्रामसेवक सचिन पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मिरज शहर, ग्रामीण, वाहतूक शाखा, महात्मा गांधी पोलिस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी आणि दंगल नियंत्रण पथकाचा मोठा पोलिस फौजफाटा तैनात होता.