

सांगली : ओल्ड कॉईनसंदर्भात अनोळखी मोबाईल क्रमांकावरून आलेली लिंक उघडल्याने एका शेतकर्याच्या बँक खात्यातून 35 हजार 800 रुपये गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी उदयसिंग बाळसिंग रजपूत (रा. कर्नाळ, ता. मिरज ) यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे.
घटनेची माहिती अशी, फिर्यादी राजपूत हे शेतकरी आहेत. त्यांना रविवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून ओल्ड कॉईनसंदर्भात एक मेसेज आला. तसेच एक लिंक देखील आली. फिर्यादी राजपूत यांनी सदर लिंक उघडली असता त्यांच्या स्टेट बॅँक ऑफ इंडियाच्या खात्यावरील 35 हजार रुपये गायब झाले. काही वेळाने ही बाब राजपूत यांच्या निदर्शनास आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच राजपूत यांनी तातडीने पोलिस ठाण्याशी संपर्क साधून फिर्याद नोंदविली. पोलिसांनी अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.