

इस्लामपूर : सासूच्या औषधोपचारासाठी माहेरहून 2 लाख रुपये आणण्यासाठी येथील नवविवाहिता अमृता ऋषिकेश गुरव (वय 25, रा. अंबाबाई मंदिराजवळ इस्लामपूर) हिचा छळ करण्यात येत होता. या छळाला कंटाळून तिने शुक्रवारी (दि. 3) विषारी द्रव प्राशन केले होते. रविवारी (दि. 5) तिचा मृत्यू झाला. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिच्या पतीसह पाचजणांवर इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे .
पती ऋषिकेश अनिल गुरव, सासू अनुपमा अनिल गुरव, सासरा अनिल मधुकर गुरव, नणंद ऋतुजा अनिल गुरव (सर्व रा. अंबाबाई मंदिराजवळ, इस्लामपूर), मामा नंदकिशोर पांडुरंग गुरव (रा. वडणगे, जि. कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी अमृता हिची आई वंदना कोले (रा. रेठरेहरणाक्ष, ता. वाळवा) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
दि. 26 डिसेंबर 2024 रोजी ऋषिकेश व अमृता यांचा प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर काही महिन्यांत पती ऋषिकेश व सासरचे लोक हे सासू अनुपमा यांच्या आजारपणासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावेत यासाठी अमृता हिच्याकडे तगादा लावत होते. तिला मारहाण करून मानसिक छळ करीत होते. पती ऋषिकेश हा मारहाण करत होता. सासू अनुपमा, नणंद ऋतुजा वारंवार अपमान करीत होते. मामा नंदकिशोर हा, ऋषिकेश याला, तू अमृताला सोडून दे, तुझं आपल्या जातीतील मुलीशी लग्न लावू, म्हणून अमृता हिला मानसिक त्रास देत होता.
सततच्या त्रासाला कंटाळून अमृता हिने शुक्रवारी सायंकाळी विषारी द्रव प्राशन केले. त्यानंतर तिला इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा प्रकार समजताच आई-वडिलांनी रुग्णालयात धाव घेतली. तिथे तिने घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. तिची प्रकृती बिघडल्याने तिला कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल केले. पण तेथे रविवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
प्रेमविवाह वर्षभर सुद्धा टिकला नाही...
अमृता हिने घरच्यांच्या विरोधात जाऊन ऋषिकेश याच्याशी प्रेमविवाह केला होता. मात्र हा विवाह वर्षभर पण टिकला नाही. अमृता हिच्या अंत्यदर्शनासाठी तिचे आई - वडील आले होते. त्यावेळी अमृता हिचा मृतदेह बघून त्यांनी हंबरडा फोडला.