Sangli News : नेर्लेत दफनभूमीच्या जागेवरील अतिक्रमणांवरून वाद

लिंगायत समाजाबांधवांचे मृतदेहासह ग्रामपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन
Sangli News
नेर्लेत दफनभूमीच्या जागेवरील अतिक्रमणांवरून वाद
Published on
Updated on

नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथील लिंगायत समाजाच्या दफनभूमीच्या जागेवरील अतिक्रमण तातडीने हटवावे, जागेची अधिकृत मोजणी करून ती समाजाच्या ताब्यात द्यावी आणि तेथे संरक्षण भिंत बांधून मिळावी, या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ संतप्त लिंगायत समाजाने थेट मृतदेह ग्रामपंचायतीसमोर ठेवून ठिय्या आंदोलन केले. बुधवारी सकाळी घडलेल्या या प्रकाराने गावात एकच खळबळ उडाली. अखेर ग्रामपंचायतीने मागण्यांबाबत लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

नेर्ले गावातील सर्व्हे नंबर ४७८/२ मधील १० गुंठे जागा लिंगायत समाजाच्या दफनभूमीसाठी मंजूर करण्यात आली आहे. मात्र, या जागेवर काही स्थानिक नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. तसेच तेथे कचरा टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून दफनविधीच्या वेळी नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात लिंगायत समाजातील नागरिकांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार लेखी तक्रारी करून दाद मागितली होती; मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती.

दरम्यान, बुधवारी सकाळी लिंगायत समाजातील श्रीधर गुंडा तेली यांचे निधन झाले. दफनभूमीच्या जागेत साचलेले पाणी, कचरा, उकिरडे आणि अतिक्रमणामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार कोठे करायचे, असा गंभीर प्रश्न नातेवाइकांसमोर उभा राहिला. या उदासीन कारभारावर संताप व्यक्त करत लिंगायत समाजातील नागरिकांनी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास श्रीधर यांचा मृतदेह थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणून ठिय्या मांडला. या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला होता. अखेर सरपंच संजय पाटील व ग्रामविकास अधिकारी यांनी आंदोलकांची भेट घेऊन हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आंदोलनात झुंझार पाटील, पंचायत समिती सदस्य समर्थ पाटील, माजी सरपंच संदीप पाटील, सतीश पाटील, सुभाष पाटील, वसंतराव पाटील, शरद बल्लाळ, महेश पाटील, किरण पाटील, साहेबराव माने यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news