

सांगली : राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात राज्यभरातील पायाभूत सुविधा, विमानतळ विकास, नदीजोड, पर्यटन प्रकल्प, उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी जाहीर केल्या आहेत. सांगली जिल्ह्याच्या वाट्याला मात्र ठोस अशी कोणतीही योजना किंवा आर्थिक तरतूद आल्याचे दिसून येत नाही. कवलापूर विमानतळाबाबत अनेक घोषणा झाल्या आहेत. मात्र अर्थसंकल्पात कवलापूर विमानतळाबाबत अगदीच मौन बाळगले आहे. जिल्ह्यातील विकासाच्या अपेक्षा अपूर्ण राहिल्याची भावना व्यक्तहोत आहे.
विमानतळ विकासाच्या बाबतीत राज्यातील विविध भागांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यासाठी विशेष हेतू प्राधिकरण स्थापनेला मान्यता देण्यात आली आहे. भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले आहे. गडचिरोली येथे ग्रीनफिल्ड विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
तसेच लातूर, बारामती आणि अमरावती विमानतळांवर रात्रीच्या उड्डाणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली आहे. शिर्डी, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, रत्नागिरी, यवतमाळ आणि कराड विमानतळांच्या विस्तारीकरणाची कामे सुरू करण्याचीही घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. मात्र कवलापूर विमानतळाचा उल्लेखही झालेला नाही. सत्ताधाऱ्यांनी कवलापूरला विमानतळ होणार, अशी घोषणा लोकसभा, विधानसभा निवडणूक तसेच महापालिका निवडणुकीवेळी केली होती. मात्र मंत्रालयस्तरावर बैठकाही झालेल्या आहेत, पण अर्थसंकल्पात कवलापूर विमानतळाबाबत काहीच उल्लेख नाही. त्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
वैनगंगा-नळगंगा नदीजोड, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी नदीजोड, दमणगंगा-एकदरे-गोदावरी नदीजोड, तसेच बारामती आणि पुरंदर तालुक्यातील अवर्षणग्रस्त भागासाठी निरा-कऱ्हा नदीजोड प्रकल्पासाठी हजारो कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातही नदीजोड प्रकल्प राबविता आला असता. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी रस्ते, पर्यटन प्रकल्पांची घोषणा होत असताना सांगली जिल्ह्यासाठी मात्र कोणतीही महत्त्वाची योजना किंवा तरतूद नसल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात मोठे उद्योग नाहीत. लघू व मध्यम उद्योगांसाठी विशेष योजना, उपक्रम दिसत नाही. त्यामुळे रोजगार निर्मिती कशी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांच्या सर्वंकष विकासासाठी सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 प्रस्तावित करण्यात आली आहे. पण सांगलीच्या सर्वंकष विकासासाठी अशी एखादी योजना का आकाराला येत नाही, असा प्रश्न सामान्य नागरिकांमधून उपस्थित होत आहे.