

ईश्वरपूर : शकुंतला नगर येथील एन. डी. पाटील शुगर्सने यंदाच्या गळीत हंगामासाठी प्रतिटन चार हजार रुपये ऊसदर जाहीर केला असून, सांगली जिल्ह्यातील हा सर्वाधिक ऊसदर असल्याचा दावा कारखाना व्यवस्थापनाने केला आहे. कारखान्याचे अध्यक्ष दत्ताजीराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा संचालक केदार पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मागील हंगामात शेतकऱ्यांना उच्चांकी प्रतिटन ३५४० रुपये दर दिला आहे. ही परंपरा कायम राखत, यंदाही ऊस उत्पादकांच्या कष्टाला अधिकाधिक मोबदला देण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मागील गळीत हंगामात कारखान्याने ९८ हजार टन उसाचे यशस्वी गाळप केले होते. त्यावेळी ऊस उत्पादकांना पहिला हप्ता ३३०० रुपये, दुसरा हप्ता १४० रुपये आणि दिवाळीपूर्वी अंतिम हप्ता १०० रुपये, असा एकूण ३५४० रुपये प्रतिटन दर देण्यात आला होता, जो इतर कारखान्यांच्या तुलनेत अधिक होता. यंदाच्या हंगामात अडीच लाख टन उसाच्या गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त दर मिळावा यासाठी व्यवस्थापन प्रयत्नशील असल्याचे केदार पाटील यांनी स्पष्ट केले. साखर, गूळ पावडर, को-जनरेशन, मळी आणि इथेनॉल निर्मितीवर भर दिला जात आहे. पारदर्शक वजनकाटा होत असल्याने कारखान्यावरील विश्वास कायम असल्याचे व्यवस्थापनाने सांगितले. या कारखान्यामुळे परिसरातील सुमारे ३०० जणांना थेट रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.
या पत्रकार परिषदेस अध्यक्ष दत्ताजीराव पाटील, संचालक केदार पाटील, मिलिंद पाटील, धनंजय पाटील, मुकुंद पाटील, समीर तांबोळी, शकुंतला नारायण पाटील, अंजली पाटील, मीरा निंबाळकर, सर्जेराव बोडरे उपस्थित होते.