Sangli Politics: राष्ट्रवादी (श. प.)चे गायकवाड, बंडगर भाजपात

गटनेत्याचाच पक्षप्रवेश घेऊन चंद्रकांत पाटील यांचा जयंत पाटील यांना दणका
Sangli Politics: राष्ट्रवादी (श. प.)चे गायकवाड, बंडगर भाजपात
Published on
Updated on

सांगली : महापालिकेतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते युवराज गायकवाड आणि नगरसेवक सुरेश बंडगर या दोघांनी मुंबईत भाजपचे ज्येष्ठ नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे. महापालिका निवडणुका होऊन पाच महिनेही पूर्ण होण्यापूर्वीच जयंत पाटील यांची राष्ट्रवादी फोडण्यात भाजपला यश आले. आता महापालिकेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे अभिजित कोळी हे एकमेव नगरसेवक उरले आहेत.

महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आघाडी केली होती. काँग्रेसला 18, तर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला 3 जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादीकडून प्रभाग 13 मधून अभिजित कोळी, तर प्रभाग 19 मधून युवराज गायकवाड व सुरेश बंडगर निवडून आले होते. त्यानंतर राष्ट्रवादीने युवराज गायकवाड यांची गटनेतेपदी निवड केली होती. गेल्या काही दिवसांपासून गायकवाड हे भाजपच्या संपर्कात होते.

मंगळवारी नगरसेवक सुरेश बंडगर यांच्यासह त्यांनी मुंबईत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी जनसुराज्य पक्षाचे समित कदम उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात मोठी खळबळ उडाली. तीनपैकी दोन नगरसेवक भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे.

महापालिकेत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे संख्याबळ 3 आहे. पक्षांतरबंदी कायद्यानुसार दोनतृतीयांश सदस्यांनी वेगळा गट स्थापन केला अथवा दुसऱ्या पक्षात प्रवेश केला, तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात कायदेशीर अडचणी आहेत. तीनपैकी दोघांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने गायकवाड व बंडगर यांच्यावर पक्षांतरबंदी कायदा लागू होत नसल्याचे जाणकारांचे मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news