

सांगली : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत प्रत्येक तालुक्यातील समीकरण वेगळे होते. आता निवडणूक संपली आहे. त्यामुळे भविष्याची वाटचाल लक्षात घेऊन सत्तास्थापनेबाबत वरिष्ठ जो काही निर्णय देतील, तो अंतिम असेल, अशी भूमिका राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातील नेत्यांनी घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. मात्र सत्तास्थापनेबाबत कोणता निर्णय घ्यायचा याबाबत एकमत होत नसल्याने निर्णय वरिष्ठांकडे सोपविण्यात आला आहे.
मिरजेतील शासकीय विश्रामगृहामध्ये बुधवारी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. त्यावेळी हा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीला आमदार इद्रिस नायकवडी, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी खासदार संजय पाटील, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार राजेंद्र देशमुख यांच्यासह निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने स्वतंत्रपणे गटात 31, आणि गणात 58 उमेदवार उभे केले होते. निवडणुकीत जिल्हा परिषदेचे 6 सदस्य निवडून आणण्यात त्यांना यश आले. या सदस्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही गटांकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र सत्ता स्थापनेत कोणाला साथ द्यायची, याबाबत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातील काही नेत्यांमध्ये मतभेद असल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पहिले एक वर्षे कोण देईल, त्याला आम्ही पाठिंबा देऊ, अशी भूमिका या पक्षातील नेत्यांनी काही दिवसांपूर्वीच घेतली होती. भाजपचे नेते, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आणि आघाडीचे नेते आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजित कदम यांच्याकडे तसा प्रस्ताव देण्यात आला होता. या प्रस्तावाबाबत युती, आघाडीत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहेत.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत प्रत्येक तालुक्यात समीकरण वेगळे होते. वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांविरोधात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने उमेदवार उभे केले होते. मात्र आता निवडणूक संपली आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करावा लागेल. तसेच आपल्या भावना पक्षाच्या वरिष्ठांना कळविल्या जातील. मात्र सत्ता स्थापनेबाबत पक्षाचे वरिष्ठ जो काही निर्णय घेतील, तो अंतिम करण्यात येईल, अशी भूमिका या बैठकीत ठरविण्यात आल्याची माहिती आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत या सहा सदस्यांतील जिल्हा परिषदेचा गटनेता निवडण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आल्याची माहिती मिळाली.