

विटा : खानापुरात मोबाईल परत घेतल्याच्या कारणावरून जामिनावर बाहेर असलेल्या आरोपीने त्याच्या मित्राचा गळ्यावर चाकूने वार करून खून केला. जयंत विश्वास भगत (वय 40, रा. खानापूर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी संशयित जावेद मुबारक आत्तार याला विटा पोलिसांनी अटक केली.
विटा पोलिसांनी सांगितले की, खानापुरातील जयंत भगत आणि जावेद आत्तार हे दोघे मित्र होते. जयंत हा एका खासगी ट्रॅव्हल्सवर क्लिनर म्हणून काम करीत होता, तर जावेद हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. यावर्षी 25 ऑगस्टरोजी त्याने स्वतःच्या मेहुण्यावर चाकूने वार करून हल्ला केला होता. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. तो सध्या जामिनावर बाहेर आला आहे.
सोमवारी रात्री जयंत हा एका खासगी ट्रॅव्हल्समधून मुंबईकडे निघाला होता. त्याला जावेद आत्तार याने फोन करून खाली बोलावले आणि त्याच्या गळ्यावर चाकूने जबर वार केला. दरम्यान, हल्ल्यानंतर संशयित जावेद पसार झाला. सोमवारी रात्रभर पोलिस त्याला शोधत होते. अखेरीस मंगळवारी सकाळी एका शेतात लपलेल्या आत्तार याला पोलिसांनी पकडले.