Sangli Police: खुनातील संशयितांचा जामीन मिळाल्याने पोलिस निरीक्षकांची बदली

आरोपपत्राच्या मुदतीच्या तांत्रिक मुद्द्याचा लाभ : सोमनाथ वाघ यांची नियंत्रण कक्षात बदली
Police Transfers
Police TransfersPudhari
Published on
Updated on

मिरज : आरग (ता. मिरज) येथे महिलेचा जाळून खून झालेल्या प्रकरणी वैध मूदतीत न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याच्या विषयावरून मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ वाघ यांची नियंत्रण कक्षात बदली केली आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार ८२ दिवस व न्यायालयाच्या म्हणण्यानुसार ९१ दिवसांनंतर आरोपपत्र दाखल केल्याचा तांत्रिक मुद्दा समोर आला आहे. त्यामुळे खुनातील संशयितांचा जामीन झाला होता. या कारणातून पोलिस अधिक्षक तुषार दोशी यांनी निरीक्षक वाघ यांची थेट बदली केली. आता मिरज शहर पोलिस निरीक्षक किरण चौगले यांच्याकडे मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे.

आरग येथे सत्यव्वा संतोष हेळवी या कर्नाटकातील महिलेला जाळून खून केला होता. याप्रकरणी कर्नाटकातील यमकनमर्डी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली होती. त्यांची पोलिस कोठडीऐवजी थेट न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. परंतु घटना महाराष्ट्रात घडल्याने हा गुन्हा १८ मार्च २०२६ रोजी यमकनमर्डी पोलिसांकडून मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याकडे वर्ग केला होता. त्यानंतर मिरज ग्रामीण पोलिसांनी २२ एप्रिल रोजी तीन संशयितांना ताब्यात घेतले. २३ एप्रिल रोजी त्यांना न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयासमोर हजर केलेल्या तारखेनुसार मिरज ग्रामीण पोलिसांनी ८२ दिवसांनी म्हणजे १३ जुलै रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. परंतु न्यायालयाने कर्नाटकातील न्यायालयीन कोठडी गृहीत का धरली नाही? असा मुद्दा उपस्थित केला.

संशयितांच्या वकीलांनी ९० दिवसांत न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले नाही, असा मुद्दा मांडून १४ जुलै रोजी तिन्ही संशयितांचे जामीनपत्र न्यायालयासमोर ठेवले. त्यानुसार न्यायालयानेही त्यांना जामीन मंजूर केला. परंतु मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक वाघ यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी संपूर्ण तपास करून ८२ व्या दिवशी न्यायालयासमोर आरोपपत्र दाखल केले होते. कर्नाटकातील कोठडी गृहीत धरली तरी १२ जुलै रोजी ९० दिवस होतात. परंतु त्या दिवशी रविवार असल्याने सोमवार, १३ जुलै रोजी आरोपपत्र दाखल केले होते.

संशयितांनी याच तांत्रिक मुद्याचा फायदा घेत न्यायालयासमोर जामीनपत्र ठेवले. त्यामुळे न्यायालयाने त्यांना जामीन दिला. परंतु पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपपत्र दाखल करण्याचा ८२ वा दिवस आणि न्यायालयाच्या म्हणण्यानुसार आरोपपत्र दाखल करण्याचा ९१ वा दिवस ठरला. या मुद्याच्या आधारे संशयितांना जामीन झाला, असा ठपका पोलिस अधीक्षक दोशी यांनी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक वाघ यांच्यावर ठेवला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्यांची नियंत्रण कक्षाकडे बदली केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news