

सांगली : मिरज येथील उत्तमनगर रेल्वे पटरीजवळ झालेल्या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी एकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासात तरुणाला मारहाण करून ढकलून दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी संशयित तुषार सिद्धार्थ सुंटनूर (वय 24, रा. पंढरपूर चाळ, मिरज) याला अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी की, उत्तमनगरमधील रेल्वे पटरीजवळ दि. 14 एप्रिलरोजी सचिन सदाशिव कोळी (वय 23, रा. कर्मवीर नगर, म्हैसाळ, ता. मिरज) हा तरुण जखमी अवस्थेत आढळला होता. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदन अहवालात डोक्याला दगड लागल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले. पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहायक पोलिस निरीक्षक जयदीप कळेकर यांना आदेश दिले.
या पथकातील हवालदार अतुल माने, रत्नजित जाधव यांना मृत सचिन कोळी आणि संशयित तुषार सुंटनूर यांच्यात वाद झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तुषार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने रेल्वे पटरीजवळ एकजण लहान मुलांना शिवीगाळ करत होता. त्याबद्दल त्याने जाब विचारला. यातून तुषार आणि सचिन यांच्यात वाद झाला. तुषार याने त्याच्या तोंडावर, नाकावर ठोसे मारून त्याला ढकलून दिले असता सचिन उतारावरून घसरून खाली जाऊन पडला. त्यावेळी त्याचे डोके दगडावर आदळून तो जखमी झाला असल्याचे त्याने सांगितले. यावरून पोलिसांनी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात संशयित तुषार सुंटनूर याच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.