

सांगली : महापालिकेने भटक्या जनावरांना पकडण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. सोमवारी भटक्या 14 घोड्यांना पकडून महापालिकेने कोंडवाड्यात बंद केले. सध्या चारा-पाणी खर्च आणि दंड असे मिळून दिवसाला 300 रुपये शुल्क आहे. ते वाढवून 1 हजार रुपये करण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनाने सुरू केल्या आहेत.
महापालिका क्षेत्रात भटकी कुत्री, गाई, घोडी व अन्य जनावरांची संख्या वाढली आहे. सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यावर ही भटकी जनावरे मोकाटपणे फिरत, धावत असतात. त्यातून अनेकदा अपघात घडले आहेत. मोकाट जनावराच्या हल्ल्यात एका नागरिकाचा बळीही गेला आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त सत्यम गांधी यांनी भटक्या, मोकाट जनावरांविरोधात मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. मोकळी सोडून दिलेली जनावरे नागरिकांना धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे संबंधित जनावरांच्या मालकांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना आयुक्त सत्यम गांधी यांनी दिल्या आहेत. त्यानुसार तीनही शहरातील भटक्या जनावरांवर कारवाई करण्यात येणार आहे, त्याचबरोबर त्यांच्या मालकांचा शोध घेऊन कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे.
उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागार्जुन मद्रासी, सहायक आयुक्त सचिन सांगावकर यांच्या उपस्थितीत मुख्य स्वच्छता निरीक्षक याकूब मद्रासी व अतुल आठवले यांच्या पथकाने 14 घोडे पकडून कोंडवड्यात पाठवले. घोड्यावर दैनंदिन होणारा खर्च त्यांच्या मालकांकडून वसूल करण्यात येणार आहे. घोडे मालक योग्य ती खबरदारी घेणार नसतील तर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती सहायक आयुक्त सांगावकर यांनी दिली. दरम्यान, 14 पैकी 10 भटक्या घोड्यांचे तीन मालक समोर आले आहेत, 4 घोडी अजूनही ‘बेवारस’ आहेत. मोकाट जनावरांना कोंडवाड्यात चारा, पाणी पुरवले जाते. त्याचा खर्च म्हणून दिवसाला 300 रुपये शुल्क, दंड आकारले जाते. त्यात वाढ करून ते 1 हजार रुपये करण्याच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या आहेत.