

सांगली : पाच वर्षांपासून एकाच विभागात काम करत असलेल्या कर्मचार्यांची माहिती घेऊन पारदर्शक बदलीचे धोरण निश्चित करावे, पंधरा दिवसात अहवाल सादर करावा, असे आदेश महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी काढले आहेत. एकाच विभागात ठाण मांडून हितसंबंध निर्माण केलेल्या ‘ठाणेदार’ कर्मचार्यांची आता बदली होणार, हे स्पष्ट झाले आहे.
प्रत्येक विभागातील मंजूर पदे, रिक्त पदे पाहून त्या विभागास लागणारी कर्मचारी संख्या निश्चित करणे, कर्मचारीनिहाय कामाचे नियोजन करणे, सध्या काम करत असलेल्या विभागातील कर्मचारी त्या कामास योग्य आहेत का, किंवा त्यांच्या कामाचे कौशल्य व शैक्षणिक अर्हता, याचा अभ्यास करून योग्य ठिकाणी नेमणूक करणे, गेल्या 2 ते 3 वर्षात कर्मचार्यांच्या प्रशिक्षणासाठी घेतलेल्या कार्यक्रमाचा अभ्यास करून नवीन तंत्रज्ञान व कार्यपद्धतीनुसार प्रशिक्षणाचे नियोजन करणे, गेल्या पाच वर्षांत एकाच विभागात काम करत असलेल्या कर्मचार्यांची माहिती घेऊन त्यामुळे नुकसान होत आहे किंवा नाही, याचा अभ्यास करून कर्मचार्यांच्या पारदर्शक बदलीचे धोरण निश्चित करणे, कर्मचार्यांच्या कामाचे मूल्यांकन करून प्रोत्साहनपर पारितोषिक वितरण करणे, एखाद्या विभागात जादा कर्मचारी असतील तर त्यांच्या कौशल्यानुसार योग्य विभागात बदली करणे, कर्मचारी तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारणे, डिजिटल कार्यप्रणाली विकसित करणे, या सर्व मुद्द्यांचा अभ्यास करून सविस्तर अहवाल 15 दिवसात सादर करावा. अहवालाच्या अंमलबजावणीसाठी कालबध्द कृती आराखडा तयार करावा, असे आदेश आयुक्त गांधी यांनी या समितीला दिले आहेत.
महापालिका कर्मचार्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, कर्मचार्यांच्या कौशल्याचा योग्य वापर सुनिश्चित करणे, यासाठी आयुक्त गांधी यांनी कर्मचारी व्यवस्थापन समिती स्थापन केली आहे. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नियुक्त केली आहे. उपायुक्त, सहायक आयुक्त, सिस्टिम मॅनेजर, अशी नऊ सदस्यीय समिती आहे.