

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवार, दि. 15 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान होणार आहे. सर्व 20 प्रभागांतील 78 जागांसाठी प्रचंड चुरस निर्माण झालेली आहे. प्रचारातील धग मतदानात उमटेल, असे चित्र दिसत आहे. सर्व 381 उमेदवारांचे राजकीय भवितव्य गुरुवारी मतदान यंत्रात बंद होईल. महापालिकेच्या या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासन व पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. मिरज येथील सेंट्रल वेअर हाऊस येथे शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल.
महापालिका निवडणुकीसाठी एकूण 4 लाख 54 हजार 430 मतदार आहेत. पुरुष मतदार 2 लाख 24 हजार 483, महिला मतदार 2 लाख 29 हजार 865, तर इतर 82 मतदार आहेत. एकूण 527 केंद्रांवर मतदान होणार आहे. यापैकी 91 मतदान केंद्रे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने विशेष देखरेखीखाली आहेत. मतदान केंद्रांवर 2 हजार 900 अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले आहेत.
ते बुधवारी दुपारी मिरज येथील सेंट्रल वेअर हाऊस येथून मतदान साहित्य घेऊन मतदान केंद्रांकडे रवाना झाले. सेंट्रल वेअर हाऊस येथे झोनल ऑफिसर्स यांनी मतदान केंद्रांध्यक्षांकडे ईव्हीम मशिन, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट तसेच मतदानविषयक साहित्य सुपूर्द केले. मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांकडे जाण्यासाठी 73 वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. सोबत पोलिस बंदोबस्त होता.
ईव्हीएम मशिन व मतदान साहित्याचे वितरण मुख्य निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सत्यम गांधी यांच्या नियंत्रणाखाली झाले. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त (निवडणूक ) अश्विनी पाटील, उपायुक्त स्मृती पाटील तसेच निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विजया यादव, सविता लष्करे, प्रमोद कदम, विवेक काळे, विशाल यादव, समाधान शेंडगे, रघुनाथ पोटे, सहायक आयुक्त विनायक शिंदे, आकाश डोईफोडे, सुनील माळी यांच्यासह नोडल अधिकारी उपस्थित होते.
पोलिस बंदोबस्तात मतदान साहित्य घेऊन मतदान अधिकारी, कर्मचारी दुपारी संबंधित मतदान केंद्रावर पोहोचले. सायंकाळपर्यंत आवश्यक तयारी पूर्ण झाली. गुरूवार, दि. 15 रोजी मतदान आहे. सकाळी साडेसहाच्या सुमारास मॉक पोल होईल. त्यानंतर सकाळी 7.30 वाजता प्रत्यक्ष मतदानास सुरूवात होईल. सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ आहे. मतदान जास्तीत जास्त होण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे.
महापालिकेच्या 2018 च्या निवडणुकीत 4 लाख 24 हजार 179 पैकी 2 लाख 59 हजारा 761 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदान 61.24 टक्के इतके झाले होते. गेल्या निवडणुकीत सर्वाधिक 77.48 टक्के मतदान प्रभाग क्रमांक 13 (सांगलीवाडी) येथे झाले होते, तर सर्वात कमी 57.33 टक्के मतदान प्रभाग क्रमांक 17 मध्ये झाले होते. यावेळी मतदानाचा टक्का वाढेल, असे चित्र दिसत आहे.
एकूण 20 पैकी काही प्रभागात तिरंगी, चौरंगी, तर काही प्रभागात बहूरंगी लढत होत आहे. प्रचारातील चुरस मतदानात दिसून येईल. मताचा टक्का वाढेल, असे चित्र दिसत आहे. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना, शिवसेना उबाठा या प्रमुख राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतमोजणी शुक्रवार, दि. 16 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मिरज येथील सेंट्रल वेअर हाऊसमध्ये सुरू होणार आहे. प्रभागनिहाय मतमोजणी होणार असून एकावेळी सहा प्रभागांची मतमोजणी केली जाणार आहे. प्रभाग क्रमांक 6, 9, 14 व 16 या चार प्रभागांमध्ये मतदान केंद्रांची संख्या 28 हून अधिक असल्याने तीन फेऱ्यात तर उर्वरीत 16 प्रभागांत दोन फेऱ्यात मतमोजणी होणार आहे. मतदान किती टक्के होणार आणि फैसला काय लागणार याकडे लक्ष लागले आहे.
जेवण काय.. भात आणि लिंबू
मतदान केंद्र अधिकारी, कर्मचाऱ्यारी बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सेंट्रल वेअर हाऊस येथे उपस्थित झाले. त्यांच्या नाष्टा, चहाची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी मतदान साहित्य मतदान केंद्राकडे घेऊन जाताना त्यांना जेवणाचे पॅकेट देण्यात आले. मात्र त्यात भात, लिंबू आणि कांदा, एवढाच मेनू होता. त्यावरून कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.