Sangli Municipal Election: बंडखोरीचा धुरळा, फटका कोणाला ?

उमेदवारांची धाकधूक वाढली : कमालीची चुरस अन्‌‍ निकालाचीही उत्सुकता
Sangli Municipal Election
Sangli Municipal ElectionFile Photo
Published on
Updated on
शशिकांत शिंदे

सांगली : भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या प्रमुख पक्षांना बंडखोरीचे मोठे ग्रहण लागले आहे. या स्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना करत आहे. अनेक नाराजांनी हातावर शिवबंधन बांधून मैदानात उडी घेतली आहे.

निवडणुकीत पक्षनिष्ठेपेक्षा बंडखोरीच अधिक चर्चेत आहे. भाजप, काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी पक्षांतील दिग्गजांनी बंडाचे निशाण फडकवल्याने प्रस्थापित नेते अस्वस्थ असणे साहजिक आहे. याचे थेट परिणाम निकालावर कसे होतात, हे पाहावे लागेल. भाजप अर्थातच सर्वाधिक मोठा पक्ष, अर्थातच या पक्षात इच्छुकही जास्त आणि ते साहजिकही आहे. त्यांच्यातील बंडखोरीचे परिणाम काय होतात, हे पाहावे लागेल. अनेक प्रभागांत जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नव्यांना संधी दिल्याने “निष्ठावंत विरुद्ध आयात” असा संघर्ष आहे. भाजपच्या हक्काच्या मतांमध्ये बंडखोर आणि अपक्ष उमेदवार खिंडार पाडणार का? ते निकालानंतर कळेल.

संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. भाजपचे माजी उपमहापौर युवराज बावडेकर यांनी पक्षांतर्गत कुरघोडीला कंटाळून भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचा (शिंदे गट) भगवा हाती घेतला आहे. ही लढत लक्षवेधी झालेली आहे.

प्रभाग आठमध्ये भाजपने यावेळी सर्वच उमेदवार बदललेले आहेत. याअगोदरच्या तिन्ही उमेदवारांना डावलल्यामुळे नगरसेविका कल्पना कोळेकर या बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्या समाजवादी पार्टीचे नितीन मिरजकर यांच्या पॅनेलमध्ये आहेत. त्या धनगर समाजातील आहेत. याचा फटका कोणाला बसणार, याची उत्सुकता आहे. याच प्रभागातील माजी नगरसेविका सोनाली सागरे यांचे बंधू महेश सागरे हे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून निवडणूक लढवीत आहेत. मात्र पक्षाच्या नेत्यांनी त्यांना पॅनेलमधून वगळून विनोद सौदे या उमेदवाराला पुरस्कृत केले आहे. या ठिकाणी सागरे यांना किती मते मिळणार व त्याचा फटका कोणाला बसणार, याकडे लक्ष आहे. याच प्रभागातून राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाकडून स्वप्निल औंधकर इच्छुक होते.

मात्र या ठिकाणी तडजोडीच्या राजकारणात काँग्रेस व राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाने हा प्रभाग राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या पक्षाला सोडला, त्यामुळे स्वप्निल औंधकर यांनी बंडाचा झेंडा फडकवत शिवसेनेचे धनुष्य हाती घेतले आहे. त्यामुळे या ठिकाणी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पॅनेलमध्ये काटा लढत आहे.

मिरजेतील प्रभाग 20 मध्ये माजी नगरसेविका स्वाती पारधी या राष्ट्रवादीमधून जनसुराज्य पक्षाकडे गेल्या, त्यामुळे या ठिकाणी काय होणार, याची उत्सुकता आहे. प्रभाग क्रमांक 20 मध्ये याअगोदर राष्ट्रवादीत असलेले योगेंद्र थोरात भारतीय जनता पक्षातून निवडणूक लढवीत आहेत. या ठिकाणी आमदार इद्रिस नायकवडी यांचे पुत्र अतहर नायकवडी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातून उभे आहेत. त्यांच्यात चुरशीची लढत आहे. प्रभाग क्रमांक पाचमध्ये मालन हुलवान या काँग्रेसमधून नगरसेविका होत्या.

निवडणुकीच्या काळात त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना उमेदवारी डावलली. त्यामुळे त्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्या निवडून येणार, की कोणाला धक्का देणार, याची उत्सुकता आहे. प्रभाग क्रमांक पाचमध्ये चंद्रकांत मैगुरे शिवसेना ठाकरे पक्षातून राष्ट्रवादीमध्ये गेले होते, मात्र त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे धनुष्य हाती घेतले आहे. या अदलाबदलीमुळे निवडणूक चुरशीची झाली. राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार गटातील वर्चस्वाच्या लढाईत अनेक सक्षम उमेदवारांनी दुसऱ्या पक्षात किंवा अपक्ष म्हणून उडी घेतली आहे. यामुळे राष्ट्रवादीची मते विभागली जाऊन अधिकृत उमेदवारांचा विजय कठीण बनला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news