

सांगली : ज्या सांगलीला नाट्यपंढरी, क्रीडापंढरी आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते, त्याच सांगलीची ओळख आता दुर्दैवाने गुन्हेगारी नगरी म्हणून होण्याच्या मार्गावर आहे. सांगली, मिरज व कुपवाड शहरात फोफावलेले ड्रग्ज रॅकेट आणि गंभीर गुन्हे दाखल असलेल्या 50 हून अधिक उमेदवारांना राजकीय पक्षांनी दिलेली उमेदवारी, यामुळे सर्वसामान्य मतदारांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सांगलीने देशाला मोठे साहित्यिक, कलाकार आणि खेळाडू दिले. मात्र, गेल्या काही वर्षांपासून शहर आणि परिसरात तसेच जिल्ह्यातील काही ठिकाणी ड्रग्ज रॅकेटने आपले पाय पसरले आहेत. तरुण पिढी या नशेत उद्ध्वस्त होत असतानाच, दुसरीकडे मटका आणि अवैध जुगाराचे अड्डे राजरोस सुरू आहेत. स्थिती इतकी बिकट झाली आहे की, प्रशासनाऐवजी सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे येऊन ‘भयमुक्त आणि नशामुक्त सांगली’ अभियान राबवण्याची वेळ आली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेल्या 300 उमेदवारांचा विचार केल्यास, त्यातील 50 पेक्षा अधिक उमेदवार पोलिसांच्या दप्तरातील नोंदीनुसार सराईत गुन्हेगार आहेत. यात खून, खंडणी, खुनीहल्ला आणि मोक्का लागलेल्या उमेदवारांचा समावेश आहे. स्वच्छ प्रतिमेचे डॉक्टर, इंजिनिअर, वकील किंवा प्रामाणिक सामाजिक कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याऐवजी, सर्वच राजकीय पक्षांनी निवडून येण्याची क्षमता, इतक्याच निकषावर गुन्हेगारांना झुकते माप दिले आहे.
रक्ताचे डाग असणारे,
नशेच्या खाईत लोटणारे...
‘आम्ही कोणाला निवडून द्यायचे? ज्यांच्या हातावर रक्ताचे डाग आहेत त्यांना, की ज्यांनी शहराला नशेच्या खाईत लोटले आहे त्यांना? राजकीय पक्षांनी सांगलीची संस्कृती विसरून केवळ सत्तेसाठी गुंडांना जवळ केले आहे’, अशा शब्दांत ज्येष्ठ नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
ड्रग्ज आणि दहशतीचा प्रभाव?
अमली पदार्थांचा व्यवहार करणाऱ्या टोळ्यांचा वावर काही ठिकाणी निवडणूक प्रचारात दिसत असल्याने, मतदानावर दहशतीचा किंवा पैशाचा प्रभाव पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वर्षाच्या सुरुवातीलाच झालेला खून आणि त्यानंतरचा हा राजकीय कलगीतुरा यामुळे सांगलीकर आता नाट्यपंढरीची प्रतिष्ठा जपण्यासाठी काय कौल देतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
स्वच्छ, सुंदर सांगलीचा खरा चेहरा उघड
बहुतेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सांगली चांगली करू, स्वच्छ करू, सुंदर करू, असे आश्वासन अनेक वर्षांपासून दिलेली आहेत. प्रत्यक्षात सांगली स्वच्छ, सुंदर होण्याऐवजी शहरातील समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहेत.
प्रशासनाच्या टायमिंगवर सवाल
पार्श्वभूमी गुन्हेगारी होती, तर प्रशासनाने निवडणूक जाहीर होईपर्यंत वाट का पाहिली? ही कारवाई अगोदरच का झाली नाही? निवडणुकीच्या अगदी तोंडावर आणि अजित पवार यांच्या सभेपूर्वीच अशा कारवाया होणे, हे राजकीय हेतूने प्रेरित वाटते का, असा प्रश्न सामान्यांना पडत आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
राजकीय नेत्यांचा कलगीतुरा
निवडणुकीच्या मैदानात केवळ उमेदवारच नाही, तर बडे नेतेही एकमेकांवर तुटून पडले आहेत. भाजप आमदार महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेचे पडसाद सांगलीत जोरात उमटत आहेत. त्यातच राष्ट्रवादी (अजित पवार गट) च्या एका उमेदवाराला तडीपार करण्यात आल्याने राजकारण अधिकच तापले आहे. आमदार जयंत पाटील यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत याला राजकीय टायमिंग म्हटले आहे, तर सत्ताधारी पक्षाने याला कायदा सुव्यवस्थेचा भाग असल्याचे सांगितले आहे.