

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 20 प्रभागांतील 78 जागांसाठी तब्बल 381 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसअखेर 301 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.
बहुसंख्य प्रभागांत बहुरंगी लढती होत आहेत. काही प्रभागांत तिरंगी, चौरंगी, तर मोजक्या दोन प्रभागांत दुरंगी लढत होत आहे. या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, शिवसेना (उबाठा) स्वबळावर लढत आहेत, तर काँग्रेस व राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाने आघाडी केली आहे. मात्र काँग्रेस तसेच दोन्ही राष्ट्रवादींचा अघोषित समझोता झालेला आहे. अपक्ष उमेदवार मोठ्या संख्येने निवडणूक रिंगणात आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी तब्बल 1 हजार 62 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीमध्ये 682 उमेदवारांचे 935 उमेदवारी अर्ज वैध ठरले होते, तर 127 उमेदवारी अर्ज अवैध ठरले होते. शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत होती. 301 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे 78 जागांसाठी 381 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात राहिले आहेत. शनिवार, दि. 3 जानेवारी रोजी निवडणूक चिन्ह वाटप व अंतिमरीत्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. मतदान दि. 15 जानेवारी रोजी, तर मतमोजणी दि. 16 रोजी होणार आहे.
शुक्रवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. सांगली, मिरज व कुपवाड शहरातील 20 प्रभागातील 78 जागांपैकी बहुसंख्य जागांवर बहुरंगी लढती होत आहेत. अशा प्रभागात एका जागेसाठी 6 ते 8 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. एका जागेसाठी सर्वाधिक 10 उमेदवार सांगलीतील प्रभाग क्रमांक 15- क या गटातून लढत आहेत, तर एका जागेसाठी सर्वात कमी दोन-दोन उमेदवार प्रभाग क्रमांक 11-ड आणि प्रभाग क्रमांक 16- ब मधून लढत आहेत. अन्य प्रभागात एका जागेसाठी कमीत कमी तीन ते जास्तीत जास्त नऊ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे या निवडणुकीत बहुरंगी लढती मोठ्या चुरशीने होणार, हे स्पष्ट आहे.
भाजपच्या अनेक अपक्षांची तलवार म्यान..!
भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या मोठी होती. 78 जागांसाठी तब्बल 529 इच्छुकांनी मुलाखत दिली होती. मात्र उमेदवार निश्चित होताच संधी न मिळालेल्या अनेकांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले, तर काहींनी शिवसेनेत व काहींनी राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी मिळवली. उमेदवारी न मिळाल्याने नाराज होऊन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या कार्यकर्त्यांशी भाजप नेत्यांनी संवाद साधला व उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली. त्यामुळे अनेक प्रबळ अपक्षांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.
या प्रमुख उमेदवारांचे अर्ज मागे...
माजी उपमहापौर आनंदा देवमाने, माजी उपमहापौर राजेंद्र मेथे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील, माजी नगरसेवक विनायक सिंहासने, माजी नगरसेविका अप्सरा वायदंडे, माजी नगरसेविका आरती वळवडे, माजी नगरसेविका शुभांगी देवमाने, काँग्रेस उमेदवार माजी नगरसेविका गायत्री कल्लोळी, राष्ट्रवादीच्या उमेदवार माजी नगरसेविका अपर्णा कदम व हर्षदा पाटील तसेच अपक्ष केदार खाडिलकर, राहुल बोळाज, दीपक शिंदे, अविनाश मोहिते, शरद नलवडे, राजू नलवडे, रौनक शहा, प्रियांका बंडगर, प्रियानंद कांबळे, श्रीकांत वाघमोडे यांच्यासह काही प्रमुख अपक्षांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.