

मिरज : महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मिरजेतील 23 जागांपैकी भारतीय जनता पार्टीला 9, अजित पवार राष्ट्रवादी पक्षाला 9, तर काँग्रेसला 4 जागा मिळाल्या. एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाला एक जागा मिळाली. मिरजेतील माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, मालन हुलवान, अनिता वनखंडे, नर्गिस सय्यद, स्वाती पारधी हे पराभूत झाले. मिरजेतील शासकीय गोदामामध्ये शुक्रवारी मतमोजणी झाली. मिरजेतील सहा प्रभागांमध्ये 23 जागांसाठी 128 उमेदवार होते.
भाजपचा आकडा घटला..
2018 च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे एकूण 12 उमेदवार निवडून आले होते. या निवडणुकीमध्ये मात्र ही संख्या कमी होऊन नऊ झाली. त्यामुळे गतवेळच्या निवडणुकीपेक्षा तीनने भाजपच्या संख्येमध्ये घट झाली आहे.
आठ विद्यमान पुन्हा सभागृहात
या निवडणुकीमध्ये भाजपच्या तीन, काँग्रेसच्या दोन आणि राष्ट्रवादीच्या दोन अशा एकूण आठ विद्यमान नगरसेवकांना पुन्हा महापालिकेत जाण्याची संधी मिळाली आहे. भाजपचे विद्यमान नगरसेवक गणेश माळी, निरंजन आवटी, संदीप आवटी या तीन विद्यमान नगरसेवकांना पुन्हा संधी मिळाली आहे.
पत्नी पराभूत, पुत्र विजयी...
शिवसेनेचे नेते मोहन वनखंडे यांनी त्यांच्या पत्नी, माजी नगरसेविका अनिता वनखंडे यांना प्रभाग दोनमधून, तर त्यांचे पुत्र सागर वनखंडे यांना प्रभाग तीनमधून उमेदवारी दिली होती. या दोघांत सागर वनखंडे हे निवडून आले, मात्र अनिता पराभूत झाल्या.
वहिनी पराभूत, दीर विजयी...
माजी महापौर मैनुद्दीन बागवान प्रभाग सहामधून निवडून आले. मैनुद्दीन बागवान यांना मिरजेतून निवडून आलेल्या अन्य 22 उमेदवारांच्या मताधिक्याचा अभ्यास केला, तर त्यांना सर्वाधिक 5913 मताधिक्य मिळाले. मात्र त्यांच्या वहिनी जरीना बागवान पराभूत झाल्या.