

सांगली : महापालिकेच्या रणधुमाळीत शिवसेनेच्या दोन गटांमधील संघर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने बाजी मारली. पहिल्यांदाच मैदानात उतरलेल्या शिंदे सेनेने 2 जागा जिंकून महापालिकेत खाते उघडले. याउलट, एकेकाळी प्रभाव असलेल्या ठाकरे यांच्या शिवसेनेला भोपळाही फोडता आला नाही.
भाजपसोबत जागावाटपाची चर्चा फिस्कटल्यानंतर मंत्री शंभुराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिंदे सेनेने स्वतंत्र लढण्याचा धाडसी निर्णय घेतला. 78 पैकी 65 जागांवर उमेदवार उभे करत त्यांनी भाजपला कडवे आव्हान दिले. ऐनवेळी मैदानात उतरूनही शिंदे सेनेचे दोन शिलेदार विजयी झाले. सध्या भाजपला सत्तेसाठी केवळ एका जागेची गरज आहे, तर विरोधकांकडेही बहुमताच्या जवळ जाणारा आकडा आहे. अशा स्थितीत शिंदे सेनेच्या या 2 जागा सत्तेची समीकरणे ठरवण्यासाठी अत्यंत निर्णायक आहेत.
दुसरीकडे, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षासाठी हा निकाल अत्यंत मानहानीकारक ठरला आहे. महाविकास आघाडीत स्थान न मिळाल्याने पक्षाने 35 उमेदवार रिंगणात उतरवले होते, मात्र एकालाही विजयाची चव चाखता आली नाही. अनेक उमेदवारांना मिळालेली मते ही अत्यंत कमी असल्याने पक्षाच्या जनाधारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रचाराच्या काळात उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांसारख्या मोठ्या नेत्यांनी सांगलीकडे फिरवलेली पाठ, हे या पराभवाचे प्रमुख कारण मानले जात आहे. स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य भरण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न न झाल्याने मशाल शांतच राहिली.
सत्तासमीकरणाचे नवे चित्र...
भाजप आणि शिंदे सेना हे राज्य पातळीवर मित्रपक्ष असले तरी, सांगलीत ते एकमेकांच्या विरोधात लढले होते. मात्र, आता महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला शिंदे सेनेच्या 2 जागा घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. शिंदे सेनेने भाजपला साथ दिल्यास महापालिकेत महायुतीची सत्ता येईल, अन्यथा सांगलीच्या सत्तेचा पेच अधिकच वाढण्याची शक्यता आहे.