

कुपवाड : सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीत प्रभाग एक व दोनमध्ये भाजपच्या नवख्या सहा उमेदवारांनी विजय मिळविला. या निवडणुकीत भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी नगरसेवक शेडजी मोहिते, सविता मोहिते, रईसा रंगरेज, विजय घाडगे यांचा पराभव झाल्याने शहरात धक्कादायक निकालाची नोंद झाली.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग एक व दोनमधून 62 टक्के मतदान झाले होते. कुपवाड प्रभाग एक व दोनमध्ये दिग्गज माजी नगरसेवक निवडणुकीसाठी उभे राहिल्याने सर्वांचे लक्ष या प्रभागातील निकालाकडे लागले होते. दिग्गज नगरसेवक या निवडणुकीत उभे राहिल्याने ‘बिग फाईट’चा प्रभाग म्हणून प्रभाग एक व दोनकडे पाहिले जात होते. प्रभाग दोनमधून भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. या ठिकाणी त्यांच्या पॅनेलमधील तीनही उमेदवार विजयी झाले.
मात्र, स्वतः पॅनेलप्रमुख असलेले ढंग यांचा निसटता पराभव झाला. त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गजानन मगदूम यांनी पराभूत केले, तर भाजपाचे प्रकाश पाटील, प्राजक्ता धोतरे, मालुश्री खोत हे तीन नवखे उमेदवार विजयी झाले. प्रभाग एकमध्ये माजी उपमहापौर विजय घाडगे यांना भाजपाचे नवखे उमेदवार चेतन सूर्यवंशी यांनी पराभवाचा धक्का दिला. सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे चारही उमेदवार निवडून आल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या या प्रभागात प्रथमच कमळ फुलले. या विजयी उमेदवारांमध्ये रवींद्र सदामते, माया गडदे, माजी नगरसेविका पद्मश्री पाटील यांचा समावेश आहे. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शेडजी मोहिते, माजी सभापती रईसा रंगरेज, माजी उपमहापौर विजय घाडगे यांचा पराभव झाला.