

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. एकूण 20 प्रभागातील 78 जागांसाठी 381 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. गुरुवार, दि. 15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. एकूण 4 लाख 54 हजार 430 मतदार असून एकूण 527 मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी 91 केंद्रे कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने विशेष देखरेखीखाली आहेत. मतदान शांततेत व सुरळीत पार पडावे, यासाठी निवडणूक यंत्रणा तसेच पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. मतमोजणी शुक्रवार, दि. 16 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे. प्रभागनिहाय मतमोजणी होणार आहे. एकावेळी सहा प्रभाग याप्रमाणे मतमोजणी सुरू होईल, अशी माहिती निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सत्यम गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महापालिका निवडणूक मतदान व मतमोजणीबाबत माहिती देण्यासाठी आयुक्त सत्यम गांधी यांनी मंगळवारी महापालिकेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त (निवडणूक) अश्विनी पाटील, उपायुक्त स्मृती पाटील, तसेच निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विजया यादव, सविता लष्करे, प्रमोद कदम, विवेक काळे, विशाल यादव, समाधान शेंडगे तसेच आचारसंहिता कक्ष प्रमुख तथा उपजिल्हाधिकारी रघुनाथ पोटे उपस्थित होते.
आयुक्त गांधी म्हणाले, महापालिका निवडणुकीसाठी एकूण 4 लाख 54 हजार 430 मतदार आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 24 हजार 644 संभाव्य दुबार मतदारांपैकी 2,564 संभाव्य दुबार मतदारांची बीएलओमार्फत सखोल पडताळणी करून त्रुटी दूर केल्या आहेत. मतदारांच्या सोयीसाठी एसएमकेसीडॉटजीओव्हीडॉटइन या संकेतस्थळावर मतदार सुविधा उपलब्ध आहे. निवडणूक साहित्य संकलन व वाटप यासाठी सेंट्रल वेअर हाऊस हे मुख्य केंद्र आहे. मतदान केंद्रांकडे जाण्यासाठी 73 वाहने आहेत. केंद्रांवरून येण्यासाठी 153 वाहने आहेत. मतदान केंद्रांसाठी 2900 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बोगस मतदान होणार नाही तसेच संभाव्य दुबार मतदार याबाबत विशेष दक्षता घेतली जात आहे.
स्ट्राँग रूमवर सीसीटीव्हीची नजर
एकूण 1145 ईव्हीएम मशीन उपलब्ध झाली आहेत. स्ट्राँग रूमला 24 तास सीसीटीव्ही आणि सशस्त्र पोलिस बंदोबस्त आहे. 2 हजार बॅलेट युनिट, 1 हजार कंट्रोल युनिट आणि आठशे डीएमएम उपलब्ध आहेत. मॉक पोल अथवा मतदान सुरू असताना ईव्हीएममध्ये काही बिघाड निर्माण झाल्यास पर्यायी ईव्हीएम पोलिस बंदोबस्तात तातडीने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यासाठी पथके नियुक्त केली आहेत, अशी माहिती आयुक्त गांधी यांनी दिली.
कायदा व सुव्यस्थेच्यादृष्टीने 91 मतदान केंद्रे विशेष देखरेखीखाली आहेत. यामध्ये सांगली शहर पोलिस ठाण्यांतर्गत 15, विश्रामबाग पोलिस ठाण्यांतर्गत 18, संजयनगर पोलिस ठाणेअंतर्गत 21, मिरज शहर पोलिस ठाणेअंतर्गत 19, महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यांतर्गत 14 आणि एमआयडीसी पोलिस ठाण्यांतर्गत 4 मतदान केंद्रे आहेत. निवडणूक साहित्य संकलन व वाटप यासाठी सेंट्रल वेअर हाऊस हे मुख्य केंद्र आहे. मतदान केंद्रांकडे जाण्यासाठी 73 वाहने आहेत. एकूणच 527 मतदान केंद्रे आहेत. सर्वच मतदान केंद्रांवर वीज, पाणी, स्वच्छतागृह यांसह विविध सोयी-सुविधा आहेत. मतदान केंद्रांवरून येण्यासाठी 153 वाहने आहेत. मतदान केंद्रांसाठी 2900 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. मतदानादिवशी मतदारांच्या आरोग्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. दहा हेल्थ पोस्टअंतर्गत बूथनिहाय तपासणीसाठी दोन सत्रांत कर्मचारी कार्यरत राहतील. सेंट्रल वेअर हाऊस, सांगली प्रसूतिगृह आणि मिरज प्रसूतिगृह येथे 3 रुग्णवाहिका व वैद्यकीय पथके सज्ज असतील.