

सांगली : काही महानगरपालिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात समाविष्ट झाल्याच्या तक्रारी राज्य निवडणूक आयोगाकडे आल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित मतदार योग्य प्रभागात समाविष्ट झाले आहेत किंवा कसे, याची तपासणी करण्यात यावी. जर असे मतदार चुकीच्या प्रभागात समाविष्ट झाले असतील तर, त्या मतदारांना योग्य प्रभागात समाविष्ट करून अंतिम मतदार याद्या प्रसिध्द करण्यात याव्यात, असे आदेश राज्य निवडणूक आयागाने दि. 25 नोव्हेंबररोजी जारी केले आहेत.
दरम्यान, सांगली महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादीत अनेक ठिकाणी घोळ झाल्याच्या तक्रारी सुरूच आहेत. हजारो मतदारांची नावे अन्य प्रभागांमध्ये समाविष्ट झाली असून अन्य प्रभागातील मतदारांची नावे नव्याने समाविष्ट झाल्याच्या तक्रारी होत आहेत. प्रारूप यादीतील या घोळामुळे अनेक इच्छुक माजी नगरसेवक वैतागून गेले आहेत. महापालिका प्रशासन तसेच राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याच्या पवित्र्यात आहेत. राज्यात अन्य काही ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात समाविष्ट झाल्याच्या तक्रारी राज्य निवडणूक आयोगाकडे गेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने मंगळवार, दि. 25 रोजी एक आदेश जारी केला आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशात म्हटले आहे की, विधानसभा मतदार यादीचे महानगरपालिकेच्या संबंधित प्रभागात योग्य प्रकारे विभाजन करणे ही संबंधित महानगरपालिका आयुक्तयांची प्राथमिक जबाबदारी आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केल्यानंतर जर त्यात काही चुका, उदा. लेखनिकांच्या चुका, दुसऱ्या प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत होणे आणि दि. 1 जुलै, 2025 च्या विधानसभा मतदार यादीत नावे असूनही संबंधित प्रभागात नावे समाविष्ट झाली नाहीत, अशा बाबी स्वतःहून निदर्शनास आल्यास अथवा अन्य मार्गाने निदर्शनास आणण्यात आल्यास त्याची तत्काळ दखल घेऊन अंतिम मतदार यादी तयार करताना त्या चुकांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर त्यात कोणत्याही चुका राहिल्याची बाब महानगरपालिका आयुक्तांच्या निदर्शनास आल्यास अशा चुकांची दुरुस्ती अंतिम मतदार यादी तयार करताना स्वतःहून करावी. या चुकांच्या दुरुस्तीसाठी कोणत्याही हरकती प्राप्त होण्याची आवश्यकता नाही.
वाढत्या तक्रारी; हजारो नावे अन्य प्रभागांत : सांगली महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोग तसेच महाराष्ट्र शासन यांच्या आदेशानुसार मतदार यादी तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दि. 20 नोव्हेंबर 2025 रोजी महापालिका प्रशासनाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. नागरिकांच्या हरकती व सूचनांसाठी दि. 27 नोव्हेंबर 2025 ही अंतिम मुदत आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत अनेक ठिकाणी घोळ झाल्याचे समोर येत आहे. अनेक मतदारांची नावे अन्य प्रभागांमध्ये समाविष्ट झाली असून अन्य प्रभागातील बरीच नावे नव्याने समाविष्ट झाल्याने अनेक इच्छुक माजी नगरसेवक संतापले आहेत. हरकती दाखल करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी अनेक इच्छुक माजी नगरसेवकांनी केली आहे.
हरकती घेण्यास 27 नोव्हेंबर अंतिम मुदत : प्रारूप मतदार यादी तपासून आवश्यक हरकती तातडीने दाखल करण्याचे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे. नागरिकांनी आपल्या नावाबाबत, पत्ता, वय, वगळणे/समाविष्ट करणे याबाबत सूचना किंवा हरकती असल्यास नमुना अ मध्ये अर्ज भरून संबंधित क्षेत्रीय कार्यालयात सादर करायचा आहे. तक्रारदारांकडून हरकती, सूचना असल्यास नमुना ब मध्ये अर्ज भरून संबंधित क्षेत्रीय कार्यालयात सादर करायचा आहे. हरकती, सूचना संबंधित क्षेत्रीय कार्यालयांमार्फत सहाय्यक आयुक्त क्षेत्रीय कार्यालय क्र. 1, 2, 3 आणि 4 यांच्या कार्यालयात दि. 27 नोव्हेंबर 2025 अखेर जमा करणे आवश्यक आहे. दि. 27 नोव्हेंबरनंतर टपाल, ई-मेल, समक्ष किंवा कोणत्याही माध्यमातून प्राप्त होणाऱ्या हरकती, सूचना स्वीकारल्या जाणार नाहीत. नागरिकांनी आपली नावे, पत्ते, यादीतील दुरुस्ती, समावेश अथवा वगळण्यासंदर्भातील सूचना वेळेतच दाखल कराव्यात.