Sangli News| मनपा क्षेत्रातील अतिक्रमित झोपडपट्ट्या नियमित होणार

आमदार इद्रिस नायकवडी यांची माहिती : सर्वेक्षणासाठी खासगी संस्थेची नेमणूक
Sangli Municipal Corporation
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकाPudhari
Published on: 
Updated on: 

मिरज : सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टीधारकांच्या झोपड्या आता नियमित करण्यात येणार आहेत. यासाठी खासगी संस्थेमार्फत सविस्तर सर्वेक्षण केले जाणार आहे. सध्या वास्तव्य असणारे झोपडपट्टीधारक, त्यांची नावे, झोपडपट्टीची जागा आणि त्यांच्या नावावर म्हाडाचे घरकुल आहे का, याची पडताळणी या सर्वेक्षणात केली जाईल. त्यानंतर पात्र झोपडपट्ट्या नियमित करण्यात येणार असल्याची माहिती आमदार इद्रिस नायकवडी यांनी दिली.

नायकवडी म्हणाले, महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी अनधिकृत झोपडपट्ट्या आहेत. यातील काहींचे यापूर्वीच पुनर्वसन करून त्यांना म्हाडामधून घरे देण्यात आली आहेत; मात्र असे असूनही काही जण अद्याप झोपडपट्टीतच वास्तव्यास आहेत. ज्यांना अद्याप म्हाडाची घरे मिळालेली नाहीत, त्यांची झोपडपट्टीतील घरे नियमानुकूल करण्यासाठी हे सर्वेक्षण राबवले जाणार आहे.

या मोहिमेंतर्गत जीपीएस आधारित मोजणी, प्रत्येक झोपडीला स्वतंत्र युनिट आयडी देणे, घराचे जीपीएस छायाचित्र, आधार क्रमांक व झोपडपट्टीधारकाचे नाव नोंदवून जिओ-टॅगिंग केले जाईल. तसेच ५०० चौरस फुटांचे डिजिटल लेआउट तयार करून रस्ते दर्शवणे, जीआयएस आधारित सॉफ्टवेअरमध्ये सर्व माहिती संकलित करणे, अतिक्रमित घरे नियमानुकूल करण्यासाठी तांत्रिक सेवा प्रदान करणे आणि वितरित घरांच्या मागणीचे जिओ-टॅगिंग मूल्यांकन करणे, यासह लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण केले जाणार असल्याचेही आमदार नायकवडी यांनी स्पष्ट केले.

म्हाडामध्ये घर असल्यास नाव वगळणार

अनेकांना म्हाडामध्ये घर मिळूनही त्यांनी झोपडपट्टीतील वास्तव्य सोडलेले नाही. त्यामुळे या सर्वेक्षणात ज्या झोपडपट्टीधारकाच्या नावावर म्हाडामध्ये घर असल्याचे आढळून येईल, त्यांचे नाव घरकुल नियमितीकरणाच्या प्रक्रियेतून वगळण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.