Sangli Municipal Corporation: वार्षिक एजन्सीवर फुली; नालेसफाईसाठी आज निविदा

स्थायी समितीतील पोस्टमार्टेमनंतर निर्णय : पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचा प्रशासनाचा दावा
Sangli Municipal Corporation
Sangli Municipal CorporationPudhari Photo
Published on
Updated on

सांगली : वाहन पुरवठ्याच्या वार्षिक एजन्सीवर अखेर फुली मारत महापालिका प्रशासनाने नालेसफाईसाठी निविदा मागविण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. वाहन पुरवठा ठेकेदारांकडून जेसीबी, पोकलँड घेऊन नालेसफाई सुरू होती. मात्र त्यावर स्थायी समिती सभेत वादळी चर्चा झाली. वाहन पुरवठा ठेक्याचे पोस्टमार्टेम झाले. त्यानंतर प्रशासनाने नालेसफाईची निविदा काढण्याचा निर्णय घेतला होता. निविदा बुधवारी महापालिकेच्या संकेतस्थळावर, तर गुरुवारी वृत्तपत्रात प्रसिद्ध होईल.

दरवर्षी शहरातील नालेसफाईवर एक कोटीवर रक्कम खर्च होते. यंदा नालेसफाईची निविदा न काढता वाहन पुरवठा ठेकेदारांकडून जेसीबी, पोकलँड व इतर वाहने भाड्याने घेऊन काम करून घेण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्यानुसार वाहन पुरवठा ठेकेदाराकडील वाहने घेऊन काही ठिकाणी नालेसफाईला सुरुवात केली होती. पण स्थायी समिती सभेत नालेसफाईच्या विषयावर वादळी चर्चा झाली. नालेसफाईबरोबरच वाहन पुरवठ्याच्या वार्षिक एजन्सीच्या कामाचाही पंचनामा सदस्यांनी केला. पोकलेन, जेसीबी, ट्रॅक्टर आदी वाहनांसाठी कमी दरात निविदा भरूनही मक्तेदाराला काम कसे परवडते, असा सवालही उपस्थित झाला. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून नव्याने शॉर्ट टेंडर काढण्याचे आदेश स्थायी समितीचे सभापती अतुल माने यांनी दिले होते.

दरम्यान, पावसाळा तोंडावर आला आहे. अशा परिस्थितीत आता निविदा काढून सर्व प्रक्रिया कधी होणार आणि प्रत्यक्ष नालेसफाई कधी सुरू होणार? तोपर्यंत पावसाळा सुरू होणार, मग नालेसफाईचे काय?, असे प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र अखेर स्थायी समिती सभेतील आदेशानंतर प्रशासनाने निविदा काढून नालेसफाईचे काम करण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसात फायली तयार करून लेखापरीक्षकांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत साऱ्यांच्या सह्या घेण्यात आल्या. आता निविदा प्रसिद्ध होईल. सात दिवस अल्पमुदतीची ही निविदा असणार आहे. निविदा प्रकिया गतीने राबवून कामाला गती देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news