

सांगली : महापालिकेच्या गुंठेवारी विभागातील सील केलेल्या ४९९१ फायलींची नोंद पूर्ण झाली आहे. या फायलींची आता 'ए', 'बी' आणि 'सी' अशी वर्गवारी करण्यात येणार आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न करता गुंठेवारी नियमितीकरण प्रमाणपत्र दिलेली प्रकरणे, शुल्क न भरता किंवा कमी शुल्क भरून प्रमाणपत्रे दिलेली प्रकरणे आणि प्रलंबित प्रकरणे यांची स्वतंत्रपणे छाननी होणार आहे. त्यातून गुंठेवारी विभागातील अनियमितता व संभाव्य गैरप्रकार समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आयुक्त संजीता महापात्र यांच्या निर्देशानुसार नगररचना आणि गुंठेवारी विभागातील कागदपत्रे यापूर्वीच सील करण्यात आली आहेत. सन २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या कालावधीतील निकाली काढलेल्या तसेच प्रलंबित असलेल्या फायलींची प्राधान्याने तपासणी केली जाणार आहे. त्यानुषंगाने आता गुंठेवारी विभागातील ४९९१ फायलींची वर्गवारी करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
दरम्यान, गुंठेवारी विभागातील सुमारे तीन हजार प्रकरणे प्रलंबित असल्याची यापूर्वीची माहिती तपासली जाणार आहे. प्रत्यक्षात किती प्रकरणे प्रलंबित आहेत, ती नेमकी कोणत्या कारणांमुळे रखडली आहेत, वेळेत निर्णय का घेण्यात आला नाही, याचीही छाननी होणार आहे. त्यामुळे प्रलंबित प्रकरणांची नेमकी संख्या आणि त्यामागील कारणेही तपासणीत स्पष्ट होणार आहेत. गुंठेवारी नियमितीकरणाच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी स्वतंत्र शिबिर घेतले जाणार आहे.
वर्गवारीनंतर प्रत्येक प्रकारातील प्रकरणांची स्वतंत्र छाननी करून त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे गुंठेवारी विभागातील ४९९१ फायलींची ही छाननी महापालिकेतील संभाव्य अनियमितता, गैरप्रकार उघडकीस आणणारी ठरणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.