

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेतील ४१ पदांवर डिसेंबरअखेर भरती होणार आहे. या भरतीमध्ये यांत्रिकी, विद्युत, मेकॅनिकल, सिव्हिल आणि पर्यावरण विभागातील शाखा अभियंत्यांच्या पदांचा समावेश आहे. तसेच लेखापाल, उद्यान अधीक्षक यांसह अन्य आवश्यक काही पदांवरही नियुक्त्या करण्यात येणार आहेत. टीसीएस या एजन्सीमार्फत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
महापालिकेने तांत्रिक ८१ पदांच्या भरतीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यापैकी ४१ पदांवर भरतीसाठी मान्यता मिळाली आहे. शासनाच्या निर्णयानुसार महानगरपालिकेतील ही भरती प्रक्रिया आयबीपीएस किंवा टीसीएस या दोन संस्थांपैकी एका संस्थेमार्फत घेण्याची तरतूद आहे. त्यानुसार सांगली महापालिकेतील ४१ पदांची भरती टीसीएसच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. उमेदवारांची लेखी परीक्षा घेऊन त्यातून पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
महापालिकेच्या विविध विभागामध्ये मंजूर पदे रिक्त असल्यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. विशेषतः तांत्रिक विभागामध्ये शाखा अभियंत्याची पदे भरल्याने विकासकामे, बांधकामे, विद्युत व्यवस्था, पर्यावरणाशी संबंधित कामे तसेच प्रशासकीय कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा आहे. डिसेंबरअखेर ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे.
लिपिक भरती केव्हा?
महापालिकेत लिपिक व अन्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांची संख्या मोठी आहे. त्याचा परिणाम महापालिकेच्या कामकाजावर होत आहे. विशेषत: पाणीपुरवठा व घरपट्टी विभागाकडे पुरेसे कर्मचारी नाहीत. गरजेच्या पदांवर भरती होणे गरजेचे आहे.