

सांगली : राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली निधन झाल्यामुळे सांगलीसह अन्य काही महापालिकांमधील सत्तास्थापनेच्या हालचाली थंडावल्या आहेत. पुढील आठवड्यात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. सांगलीत भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी युतीचे संकेत मिळत आहेत.
महापौर, उपमहापौर निवडणूक दि. 10 फेब्रुवारीरोजी होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना गती आली. महापालिकेत भाजप नगरसेवकांचे संख्याबळ 39 आहे. अवघ्या एका जागेने भाजपचे बहुमत हुकले आहे. भाजपने बहुमतासाठी शिवसेनेबरोबर चर्चा केली आहे. भाजप नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तसे स्पष्टही केले आहे. मात्र महापालिकेत स्थायी समितीत बहुमतासाठी केवळ भाजप-शिवसेना युती पुरेशी नाही. या युतीत राष्ट्रवादीलाही सहभागी करून घ्यावे लागणार आहे, तरच स्थायी समितीत बहुमत प्राप्त होते.
या सर्व पार्श्वभूमीवर सत्तास्थापनेच्या हालचाली वरिष्ठ स्तरावरून सुरू होत्या. मंगळवारी रात्री भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठकही झाली होती. सांगलीत महापालिकेत एकत्र येऊन सत्तास्थापनेचा निर्णय झाला होता. बुधवारी माहिती कळणार होती, असे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी सांगितले. मात्र बुधवारी सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. त्यांच्या निधनाने गेले दोन दिवस महाराष्ट्र सुन्न झाला आहे. दरम्यान, सांगलीतील सत्ता स्थापनेबाबत मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? सत्ता वाटपाचे सूत्र काय ठरले, याबाबतची माहिती पुढे आलेली नाही. महापौर भाजपचा होणार हे स्पष्ट आहे. मात्र शिवसेनेने उपमहापौर पदावर हक्क सांगितला आहे, तर राष्ट्रवादीकडून स्थायी समिती सभापती व काही प्रभाग समिती सभापतीपदावर हक्क सांगितला आहे.