Sangli municipal corporation: ‘स्वीकृत‌’साठी विक्रमी 72 अर्ज

जागा 8 : भाजपकडे 4 जागांसाठी 29 इच्छुक; यादी प्रदेशाध्यक्षांकडे
Sangli Municipal Corporation
Sangli Municipal CorporationPudhari Photo
Published on
Updated on

सांगली : महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवकांच्या 8 जागांसाठी विक्रमी 72 अर्ज छाननीसाठी नगरसचिवांकडे दाखल झाले आहेत. भाजपकडे 8 जागांसाठी 29, काँग्रेसकडे 2 जागांसाठी 22, तर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडे 2 जागांसाठी 17 इच्छुकांनी अर्ज केले आहेत. याशिवाय 4 सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट नगरसचिवांकडे अर्ज केले आहेत. भाजपची यादी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे सादर होत आहे. इच्छुकांच्या मोठ्या संख्येमुळे भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. दि. 17 रोजीच्या महासभेत स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी जाहीर होणार आहेत.

स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपचे 4, काँग्रसचे 2 व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे 2, असा कोटा आहे. शुक्रवारी भाजपचे गटनेते तथा सभागृह नेते संदीप आवटी, काँग्रेसचे गटनेते तथा विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण तसेच राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी त्यांच्याकडे आलेल्या इच्छुकांचे अर्ज छाननीसाठी नगरसचिव सहदेव कावडे यांच्याकडे सादर केले. पात्र, अपात्र उमदवारांची यादी दि. 15 अथवा 16 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

भाजपककडून इच्छुक असलेल्यांमध्ये विश्वजीत पाटील, पांडुरंग कोरे, विजय पाटील, सुजित राऊत, शितल लोंढे, हणमंत पवार, अजिंक्य पाटील, दरिबा बंडगर, मनोज सरगर, केदार खाडिलकर, कय्युम पटवेगार, स्मिता पवार, राहुल बोळाज, बिपीन कदम, रोनक शहा यांचा प्रामुख्याने समावेश आहे. दरम्यान, शेखर इनामदार म्हणाले, मी स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छूक नसल्याचे दीड महिन्यांपूर्वीच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सांगितलेले आहे. काँग्रेसकडून इच्छुक असलेल्यांमध्ये अमित शहा, विजय आवळे, सागर बिरनाळे, आशा संजय पाटील, नितीन मिरजकर, रहिम हट्टीवाले, विशाल कलगुटगी, कुमार पाटील, सुफियान पठाण, असिफ बावा, प्रमोद सूर्यवंशी यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेल्यांमध्ये शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, आयेशा इद्रिस नायकवडी, स्नेहल सावंत, चंद्रकांत हुलवान, जमिल बागवान, दिगंबर जाधव, राधिका हारगे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या तीनही पक्षांकडे अर्ज दिला आहे. वि. द. बर्वे, तानाजी रूईकर, रवींद्र वळवडे यांनी थेट नगरसचिवांकडे अर्ज केला आहे.

माजी नगरसेवकही इच्छुक

स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छुक असलेल्या यादीत महापालिका निवडणुकीतील पराभूत उमेदवार, माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, पक्षाच्या कोअर कमिटीतील नेत्यांचे नातेवाईक, कार्यकर्त्यांचा समावेश आहे. आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, जयश्री पाटील यांच्या समर्थकांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आमदार इद्रिस नायकवडी यांच्या पत्नी आयेशा नायकवडी, राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील समर्थक शेखर माने यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून स्वीकृत नगरसेवकपदासाठी अर्ज केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news