Sangli Municipal Corporation: सभापतींशी वाद नाही, पत्रव्यवहाराचा चुकीचा अर्थ

महापौर सूर्यवंशी; पालकमंत्र्यांकडून गंभीर दखल : कोअर कमिटी, नगरसेवकांसोबत आज बैठक
Sangli Municipal Corporation
Sangli Municipal CorporationPudhari Photo
Published on
Updated on

सांगली : महापौर-स्थायी सभापती असा कोणताही वाद नाही. मी पक्षीय आदेश मानणारा कार्यकर्ता आहे. भाजपच्या ध्येय-धोरणानुसार सर्वांना विश्वासात घेऊन काम करत आहे. सभापती व माझ्यामध्ये कोणताही वाद नव्हता आणि नाही. काही नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या कायदेशीर मुद्यांबाबत प्रशासनाकडून खुलासा होणे आवश्यक असल्याने त्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र त्याचा चुकीचा अर्थ लावल्याचे दिसून येत आहे, असे महापौर धीरज सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.

महापौर सूर्यवंशी म्हणाले, भाजपच्या धोरणानुसार व पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन एकसंधपणे कामकाज सुरू आहे. पक्षीय आदेशानुसार काम करणे हेच आपले कर्तव्य असून नागरिकांच्या प्रश्नांवर उपाययोजना करून त्यांचे प्रश्न सोडविण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी सर्व विभाग प्रमुख्ाांना विश्वासात घेऊन कामकाज करण्यात येत आहे. सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य लाभत आहे. नूतन आयुक्त संजीता महापात्रा या देखील सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्या आयुक्त आहेत.

अनुभव आणि त्यांच्या कार्यतत्पर निर्णयाने लवकरात लवकर निर्णय प्रक्रिया होणार आहे, असे माझे मत झाले आहे. नूतन आयुक्त यांची देखील वेळोवेळी भेट घेऊन महापालिकेच्या कामकाजामध्ये सुधारणा करण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. सध्या सभागृहामध्ये डॉक्टर, वकील व तज्ज्ञ सदस्य आहेत. त्यांच्या ज्ञान व अनुभवाचा उपयोग करून महापालिकेच्या विकासाबरोबर दैनंदिन कामकाजात सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पालकमंत्री सरसावले; नेते, नगरसेवकांना आज देणार कानमंत्र

पक्षातील गटबाजी व महापौर आणि स्थायी सभापती यांच्यातील वादाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलावून घेत समन्वयाने काम करण्याच्या सूचना आणि सबुरीचा सल्लाही दिला. येथील एका हॉटेलमध्ये शनिवारी सकाळी 8.30 वाजता भाजप शहर जिल्हा कोअर कमिटी व 9.30 वाजता भाजप नगरसेवकांची बैठक बोलावली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे आता काय कानमंत्र देणार, याकडे लक्ष लागले आहे.

अर्थसंकल्प चार दिवसात

आयुक्त सत्यम गांधी यांनी महापालिकेचा 2026-27 चा 1 हजार 65 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यामध्ये स्थायी समितीने 93 कोटींची वाढ करून 1 हजार 173 कोटी जमा आणि 1 हजार 116 कोटी खर्चाचा व 467 कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती अतुल माने यांनी महापौर धीरज सूर्यवंशी यांच्याकडे सादर केला होता. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अर्थसंकल्पीय सभा झाली होती. नगरसेवकांच्या सूचनांसह अर्थसंकल्पाला महासभेने मान्यता दिली. त्यानुसार महापौर धीरज सूर्यवंशी हे खातेप्रमुख व प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा करून अर्थसंकल्प अंतिम करत आहेत. येत्या चार दिवसात अर्थसंकल्प तयार होईल, असे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news