Sangli News : ४१९ मिळकतींच्या १२१ एकराला लागणार महापालिकेचे नाव

तीन वर्षात ४१६६ कोटींच्या २ हजारावर मिळकतींचा शोध
Sangli Municipal Corporation
Sangli Municipal CorporationPudhari Photo
Published on: 
Updated on: 

सांगली : महापालिका क्षेत्रातील ४१९ मिळकतींच्या बिनशेती आदेशातील अटींचा भंग झाल्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू आहे. त्यानुसार या मिळकतींच्या १२१ एकर क्षेत्राला महापालिकेचे नाव लावण्यासाठी संबंधित तहसीलदारांकडे प्रस्ताव दिला आहे. गेल्या तीन वर्षात ४१६६ मिळकतींचा शोध लागला आहे. या मिळकतींचे किमान मूल्य ४१६६ कोटी रुपये आहे. त्यापैकी एकूण ९५९ सर्व्हे नंबर्समधील २९५.१५ एकर क्षेत्रावर महापालिकेचे नाव नोंद झालेले आहे.

महानगरपालिकेच्या मालकीच्या स्थावर मिळकतींचा शोध घेणे, त्यांची महसुलीदप्तरी योग्य नोंद करणे, प्रत्यक्ष ताबा मिळविणे आणि मालमत्ता नोंदवही अद्ययावत करण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. या नावीन्यपूर्ण मोहिमेला 'भूमी शोध संचयन' (लॅण्ड सर्च बँक) असे नाव देण्यात आले आहे. महापालिकेची स्थापना दि. ९ फेब्रुवारी १९९८ रोजी झाली. स्थापनेनंतर महापालिकेच्या मिळकतींचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये एकूण ६२९ मिळकतींची नोंद झाली होती. त्यानंतर सप्टेंबर २०२१ मध्ये निवृत्त महसूल अधिकारी शेखर परब यांची मालमत्ता नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या माध्यमातून वड्डी येथील ५४ एकर आणि सांगलीत हनुमाननगर येथील १६.२३ एकर क्षेत्रासह एकूण २८८ मिळकतींचा शोध लागला.

विशेष पथक नियुक्त

महापालिकेच्या शेकडो स्थावर मिळकतींच्या मालकीच्या नोंदी महसुली अभिलेखांमध्ये नसणे, नगरभूमापन, सात/बारा संगणकीकरण व पुनर्लेखन प्रक्रियेदरम्यान झालेल्या हस्तदोषांची दुरुस्ती करणे, या कामांची व्याप्ती लक्षात घेऊन तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांनी निवृत्त नायब तहसीलदार व मंडल अधिकारी यांचे पथक स्थापन केले. या पथकामार्फत मोहीम राबविण्यात आली. त्याअंतर्गत पथकाने सन १९३२-३३ पासून सन २०१३-१४ पर्यंतच्या हस्तलिखित सात/बारा उताऱ्यांची व फेरफार नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली. या तपासणीत महापालिकेच्या मालकीच्या २ हजारावर मिळकती असल्याचे आढळून आले. या कार्यवाहीत एकूण ९५९ सर्व्हे नंबरमधील २९५.१५ एकर क्षेत्र नावे करून घेण्यात यश आले आहे.

४१९ मिळकतींबाबत शर्तभंगाची कार्यवाही

आयुक्त संजीता महापात्र यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महसूल अधिकाऱ्यांशी कायदेशीर तरतुदींच्या अनुषंगाने चर्चा करून कार्यवाहीला देण्यात आली. त्यानुसार सांगली, मिरज व कुपवाड या तीन गावांमधील ४१९ मिळकतींचे एकूण १२१.२० एकर क्षेत्र निश्चित करून त्यांची गावनिहाय व सर्व्हे नंबरनिहाय यादी तयार करण्यात आली. संबंधित मिळकतींच्या बिनशेती आदेशातील शर्तभंगाबाबतच्या नोटिसा प्रसिद्ध करण्यात आल्या. एकाही प्रकरणात आक्षेप नसल्याने पुढील कार्यवाहीस संबंधित तहसीलदारांकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत, असे महापालिकेतून सांगण्यात आले.

सर्व्हे नंबरमधील महापालिकेच्या नावे नोंद झालेल्या, ताब्यात घेतलेल्या तसेच नावनोंदीची प्रक्रिया सुरू असलेल्या मिळकतींचे किमान मूल्य ४,१६६ कोटीवर आहे. या मिळकतींचे प्रत्यक्ष बाजारमूल्य यापेक्षा अधिक आहे. सर्व्हे नंबरमधील महापालिकेच्या मालकीच्या खुल्या जागांचे एकूण क्षेत्र सुमारे ४१७ एकर असून, महापालिकेने खरेदी केलेल्या तसेच जिल्हाधिकारी यांनी यूएलसीअंतर्गत प्रदान केलेल्या जागांचे क्षेत्र सुमारे ४५९ एकर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.