Sangli News : महापालिकेच्या कोट्यवधींच्या जागेचा बाजार करण्याचा डाव

राष्ट्रवादीच्या गटनेत्यांचा आरोप ; दोन एकर जागा खासगी व्यक्तीला देण्याच्या हालचाली?
Sangli Municipal Corporation
Sangli Municipal CorporationPudhari
Published on: 
Updated on: 

सांगली : महापालिकेच्या मालकीची मिरजेतील सुमारे दोन एकर जागा तडजोडीच्या माध्यमातून खासगी व्यक्तीला देण्याचा डाव सुरू असल्याचा गंभीर आरोप महापालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी केला आहे.

बागवान म्हणाले, 'यूएलसी' कायद्यांतर्गत काही जागा शासनाने महापालिकेकडे हस्तांतरित केल्या होत्या. काही जागेच्या मालकीसंदर्भात न्यायालयीन वाद निर्माण झाला होता. त्यापैकी महापालिकेच्या मालकीबाबत उच्च व सर्वोच्च न्यायालयात शिक्कामोर्तब झालेले आहे. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे एक वाद न्यायप्रविष्ट आहे. अशा परिस्थितीत तडजोडीच्या नावाखाली मिरजेतील सुमारे दोन एकर जागा खासगी व्यक्तीला देण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळत आहे. त्यासाठी एका माजी पदाधिकाऱ्याचे प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेच्या मालकीची आणि कोट्यवधी रुपये बाजारमूल्य असलेली जमीन अशा पद्धतीने तडजोडीतून खासगी व्यक्तीला देणे हा महापालिकेच्या हिताला धक्का देणारा निर्णय ठरेल. महापालिकेच्या मालकीची जागा कोणत्याही तडजोडीच्या नावाखाली खासगी व्यक्तीच्या ताब्यात जाऊ देणार नाही. महापालिकेचे आर्थिक नुकसान करून कोट्यवधी रुपयांची जागा कोणाच्या घशात घालण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला जोरदार विरोध केला जाईल, असा इशारा बागवान यांनी दिला आहे.

महापालिकेचीच मालकी असलेली जागा पुन्हा महापालिकेनेच विकत घेण्याचा प्रकार यापूर्वी माळबंगला परिसरातील जागेबाबत झालेला आहे. महापालिकेच्या मालकीची जागा असतानाही ती खरेदी करण्याचा प्रकार घडला असून, या प्रकरणाची चौकशी रखडली आहे. आता तशाच प्रकारचा कित्ता गिरवला जात आहे. २००४ च्या महासभेतील ठरावाचा आधार घेऊन तडजोड करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र यातून महापालिकेचे नुकसान होणार आहे. त्यामुळे हा डाव हाणून पाडू, असा इशारा बागवान यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news