

सांगली : महापालिका क्षेत्रातील वाढत्या गुन्हेगारीबाबत गुरुवारी झालेल्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी तीव्र चिंता व्यक्त केली. कुपवाड येथील मनीषा व मोहन केसरेकर यांच्या दुहेरी हत्याकांडाचा सभेत निषेध करण्यात आला. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली. दरम्यान, महासभेत सांगली, मिरज आणि कुपवाडमधील गुन्हेगारीचा विळखा आणि कायदा व सुव्यवस्था याचा पंचनामा करण्यात आला.
कुपवाडमधील मोहन केसरेकर व त्यांच्या पत्नी मनीषा यांच्यावर आरोपी फरीद शेख याने जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेने शहर हादरले असून, गुरुवारी महासभेत या हत्याकांडाचा निषेध केला. आरोपीला कठोर शिक्षा देण्याच्या मागणीचा ठरावही करण्यात आला.
नगरसेवक विष्णू माने म्हणाले, केसरेकर कुटुंबीयांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात या पती-पत्नीचा मृत्यू झाला. त्यांची दोन्ही मुले उघड्यावर आली आहेत. महापालिकेनेही या कुटुंबाला आर्थिक मदत करावी. नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी, महापालिका हद्दीत खून, नशेखोरी आणि अमली पदार्थांची तस्करी वाढल्याचा मुद्दा उपस्थित केला.
उपमहापौर गजानन मगदूम यांनी कुपवाडमधील आलिशान कॉलनी आणि विघ्नहर्ता कॉलनी परिसरात यापूर्वीही खुनाच्या घटना घडल्याकडे लक्ष वेधले. केसरेकर यांच्या मुलाच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी घेत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुलीच्या लग्नासाठी एक लाख रुपये देण्याची घोषणा केली.
नगरसेविका स्वाती शिंदे म्हणाल्या, आरोपी शेखने केलेले बेकायदा बांधकाम महापालिकेने पाडले. त्याबद्दल आयुक्त संजीता महापात्र, उपायुक्त स्मृती पाटील यांचे विशेष अभिनंदन आहे, असेही त्या म्हणाल्या. विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी आपले एक महिन्याचे मानधन केसरेकर कुटुंबाला देण्याचे जाहीर केले. सर्वच नगरसेवकांनी एक महिन्याचे मानधन देण्याची तयारी दाखवावी, असे आवाहन केले. अनेक नगरसेवकांनी महापालिका क्षेत्रातील वाढती गुन्हेगारी, वाढती नशेखोरी यावर चिंता व्यक्त केली. पोलिस प्रशासनाने ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी केली.